देशात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आरोग्य कर्मचा-यांच्या सेवेबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. या सूचनांनुसार, कोरोनाची कोणतीही लक्षणे नसतील, तर आरोग्य कर्मचारी अवघ्या तिस-या दिवशीही रुग्णसेवेत रुजू होऊ शकतील, असे केंद्रीय आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.
नवीन मार्गदर्शक तत्त्वे
देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढत आहे. मात्र कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेपेक्षा या तिस-या लाटेत रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी असल्याचे निरीक्षण आरोग्य खात्याने नोंदवले आहे. असे असले तरी, पहिल्या दोन लाटेपेक्षा रुग्णसंख्या जास्त वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोना उपचाराचे नवीन मार्गदर्शक तत्त्व केंद्राने जाहीर केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करताना, डाॅक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचा-यांना संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना विषाणूंचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
( हेही वाचा: ‘स्वायत्त संस्था कर्मचारी सरकारी सेवा लाभांचा दावा करू शकत नाहीत’)
तर तीन दिवसांत कामावर
तसेच, कोरोना संसर्ग झाल्यास त्यांची तपासणी आणि विलगीकरणाच्या व्यवस्थेबाबतच्या सूचनांचा यात समावेश आहे. रुग्णसेवा करताना आरोग्य कर्मचा-यांना कोरोना झाल्यास तातडीने त्यांनी विलगिकरण करावे.आवश्यकता भासल्यास त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. आरोग्य कर्मचा-यांचा गृहविलगिकरणात उपचार सुरु असेल आणि त्यांना ताप नसेल, तर ते तिस-या दिवशीही रुग्णसेवेत दाखल होऊ शकतात. मात्र त्यांना व्यवस्थित कोरोना प्रतिबंधक साधनांचा वापर करुन रुग्णसेवा करण्याची सूचना या मार्गदर्शक पत्रात करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community