सध्या संपूर्ण देशात लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन लशी सध्या दिल्या जात असताना, आता कोविशिल्ड लसीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत नवीन निर्देश जारी करण्यात आले आहेत. कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठीच्या मधला कालावधी आता वाढवण्यात आला आहे.
दोन डोसमधील अंतर वाढले
कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड अशा दोन्ही लसींचे प्रत्येकी दोन डोस सध्या दिले जात आहेत. या दोन डोसच्या मधला कालावधी हा ४ आठवडे म्हणजेच २८ दिवस इतका आहे. पण कोविशिल्डच्या दोन डोसमधला कालावधी आता केंद्रीय आरोग्य मंत्रालायामार्फत वाढवण्यात आला आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर हे आता ६ ते ८ आठवडे करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. पण कोवॅक्सिनच्या बाबतीत हे नवीन निर्देश लागू नसतील, असेही आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे लस प्रभावी
आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून याबाबात माहिती दिली आहे. तज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. नॅशनल टेक्निकल एडव्हायजरी ग्रुप ऑन इम्यूनायजेशन (NTAGI) आणि लसीकरणाच्या तज्ज्ञ टीमच्या नव्या संशोधनात कोविशिल्ड लस ही ४ ऐवजी ६ ते ८ आठवड्यांमध्ये देण्यात आल्यानंतर जास्त प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community