कांजूर,नाहूर,भांडुपकरांसाठी नवीन रुग्णालय! वाराणसीच्या कंत्राटदारावर सोपवली जबाबदारी

162

मागील दहा ते बारा वर्षांपासून बहुप्रतिक्षेत असलेल्या नाहूरमधील रुग्णालयाच्या बांधकामाचा मुहूर्त अखेर ठरला. या रुग्णालयाच्या बांधकामासाठी सर्व निविदा प्रक्रिया पार पडली असून, यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ६७० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

यामध्ये वाराणसीला कर्करोग रुग्णालय उभारणाऱ्या मेसर्स कॅपासिटे-ई-गवर्नन्स या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात उत्तम काम करणाऱ्या कंपनीला मुंबई महापालिकेत या रुग्णालयाच्या बांधकामाच्या निमित्ताने सत्ताधारी शिवसेनेने प्रवेश दिल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

(हेही वाचाः बाळासाहेबांचा ‘हा’ नारा आता ऐकू येणार नाही! शरद पोंक्षेंना वाटते भीती)

उर्वरित जागेवर रुग्णालय बांधण्याचा निर्णय

पूर्व उपनगरातील नाहूर गाव येथे महापालिकेच्यावतीने नवीन रुग्णालयाचे बांधकाम केले जाणार आहे. ही जागा मुंबई महापालिकेला रुणवाल ग्रीन्स या विकासकाकडून प्राप्त झाली होती. परंतु यावर मनोरंजन मैदानाचे आरक्षण टाकण्याचा घाट घातला जात असल्याची बाब लक्षात येताच, तत्कालीन मनसे नेते शिशिर शिंदे यांच्यासह महापालिकेतील नगरसेविका अनिषा माजगावकर आदींनी आक्षेप घेत, यावर रुग्णालयाचे आरक्षण टाकण्यासाठी भाग पाडले होते. परंतु पुढे विकासकाने नियोजित रस्त्यांसाठी जास्त जागा दिल्याने न्यायालयात धाव घेतली आणि ही जागा महापालिकेने त्यांना दिल्यानंतर उर्वरित जागेवर हे रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे फोर्टीसच्या मागील बाजूला असलेल्या जागेचा भागही महापालिकेच्या ताब्यात आल्याने रुग्णालय आणि इतर सेवांसाठी इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

म्हणून या कंपनीची निवड

रुग्णालयासाठी या जागेवर रुग्णालय इमारत, सेवा इमारत आणि कर्मचारी निवासी इमारत बांधली जाणार आहे. तब्बल ३६० खाटांचे हे प्रस्तावित रुग्णालय असेल. या इमारतीच्या बांधकामाचे आराखडे, यांत्रिकी कामे, विद्युत व यांत्रिक कामे तसेच वातानुकुलित यंत्रणा, अग्निरोधक यंत्रणा, मेडिकल गॅस सिस्टीम, मॉड्युलर ओटी सिस्टीम, न्यूमॅटिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आदी सुविधा योजना या सल्लागारांमार्फत तयार करून, त्यानुसार मागवलेल्या निविदांमध्ये कॅपासिटे ई गवर्नन्स या कंपनीने महापालिकेच्या अंदाजपत्रकानुसार २९ टक्के अधिक दराने बोली लावून हे काम ६०५ कोटी रुपयांमध्ये आणि विविध करांसह ६७०.९२ कोटी रुपयांचे कंत्राट मिळवले आहे. या कंपनीने वाराणसी येथे कर्करोग निवारण केंद्राचे बांधकाम केले होते. त्यामुळे या कंपनीची निवड महापालिकेने केली आहे.

(हेही वाचाः चौपाट्यांवर आता सुलभ सुविधा: पर्यटकांची मोठी प्रतीक्षा संपणार)

गरज वाहनतळाची की रुग्णालयासाठी सेवा निवासस्थानाची?

या रुग्णालयाच्या बांधकामासाठी सन २०१५-१६ मध्ये सल्लागार नेमले गेले होते. त्यानंतर याच्या कंत्राट कामांचा प्रस्ताव यायला २०२२ उजाडले. म्हणजे कंत्राटदाराची नेमणूक करायला सात वर्षे उजाडली. मग प्रत्यक्षात बांधकाम पूर्ण होऊन जनतेला याची सेवा मिळायला १४ वर्षे जाणार का, असा सवाल त्यांनी केला. ऍशफोर्डच्या पाठीमागील जागेत परिचारिकांसाठी वसाहत बांधण्याची मागणी आम्ही केली होती. परंतु आता त्याठिकाणी वाहनतळ बनवण्यात आले आहे. म्हणजे वाहनतळाची जास्त गरज आहे, की रुग्णालयासाठी सेवा निवासस्थानाची, असा सवाल मनसेच्या तत्कालीन नगरसेविका व मनसे उपाध्यक्ष अनिषा माजगांवकर यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.