सांग सांग भोलानाथ,,, या बालगीतातली आठवड्यातून तीन-तीन रविवार येण्याची आशा आता खरी होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारकडून नवीन कामगार कायदे लागू करण्याचा विचार करण्यात येत आहे. 1 जुलै 2022 पासून हे कायदे लागू करण्याची शक्यता आहे. जर हे कायदे लागू झाल्यास ऑफिसच्या सुट्ट्या, वेळा आणि पगाराबाबत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे बदल होण्याची शक्यता
केंद्र सरकार लवकरात लवकर चार नवीन कामगार कायदे लागू करण्याच्या तयारीत आहे. या नवीन कामगार कायद्यांमुळे देशातील गुंतवणूक वाढून, रोजगाराच्या जास्तीत-जास्त संधी उपलब्ध होतील, असे सरकारचे मत आहे. नव्याने लागू करण्यात येणा-या या कामगार कायद्यांमध्ये वेतन, पेन्शन, ग्रॅच्युईटी, कामगार कल्याण, आरोग्य, सुरक्षितता आणि कामाच्या परिस्थिती (महिलांसह) यांच्याशी संबंधित सुधारणांचा समावेश आहे.
(हेही वाचाः EPFO: आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून अकाऊंटवर येणार PF चे व्याज)
चार दिवसांचा आठवडा
हे कायदे लागू झाल्यास कर्मचा-यांना आठवड्यातून चार दिवस काम करुन तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. मात्र चार दिवसांत त्यांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हे चार दिवस त्यांच्या कामाच्या वेळा 8 ते 9 तासांवरुन 12 तासांपर्यंत वाढवल्या जाऊ शकतात. मात्र, आठवड्यातील एकूण कामकाजाच्या तासांमध्ये बदल न करण्याचा विचार आहे.
पगारामध्ये बदल होण्याची शक्यता
तसेच या नवीन कायद्यांमुळे कर्मचा-यांना मिळणा-या पगारामध्येही बदल होण्याचे सांगण्यात येत आहे. कर्मचा-यांना मिळणार पगार कमी होण्याची शक्यता असून त्यांच्या पीएफ आणि ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे निवृत्तीनंतर कर्मचा-यांना चांगले पैसे शिल्लक राहणार आहेत.
Join Our WhatsApp Community