नवी मुंबई विमानतळाच्या बांधकामात ‘या’ खारफुटींच्या अस्तित्वावर घाला

176

नवी मुंबईतील विमानतळाच्या बांधकामात तिवर (अविसिनिया मरिना), चिपी (सॉनरेकिया अपेटाला) या सहजतेने आढळणा-या खारफुटींची संख्या कमी होत चालल्याची माहिती अभ्यासातून समोर आली आहे. वनविभागाच्या कांदळवन कक्षाने बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील संशोधकांसह रायगड जिल्ह्यातील खारफुटींचा अभ्यास केला. या अभ्यासात मानवी हस्तक्षेपात दुर्मिळ तसेच सहजतेने आढळून येणा-या खारफुटींवर कु-हाड पडत असल्याचे आढळून आले. यासह कालेश्री, दोळवी, रेवस जेट्टी, रेवदांडा, वाशी-निगडी, मेंदडी, अंबेट, नवीवाडी-विचारेवाडी या रायगड जिल्ह्यातील भागांतही खारफुटींवर बांधकाम तसेच वाळू उपसा आदी प्रकारांमुळे खारफुटींचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचे सिद्ध झाले आहे. खारफुटींच्या कत्तलीबाबत कारवाई करण्याच्या सूचना कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच अलिबाग वनविभागाचे उपवनसंरक्षक यांना अगोदरच दिल्या आहेत. मात्र या कारवाईच्या सद्यस्थितीबाबत माहिती मिळू शकली नाही.

mangrov1

१५ विविध प्रकारच्या खारफुटींच्या प्रजातींचा शोध 

रायगड जिल्ह्यातील खाडी परिसरातील तब्बल १५ विविध प्रकारच्या खारफुटींच्या प्रजातीचा शोध लागल्याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानने मंगळवारी दिली. रायगड जिल्ह्यातील खारफुटींचे संशोधन बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या सौरभ चंदनकर, गणेश पवार तसेच डॉ. अजित टेळवे यांनी केले. पंधरा प्रजातींपैकी बहुतांश भागांत तिवर (अविसिनिया मरिना), सुगंधा (एजिसिरस कॉर्निक्युलेटम), चिपी (सॉनरेकिया अपेटाला) ही सहज आढळून येणा-या प्रजाती त्यांना दिसून आल्या. उरण खाडी, कारंजा खाडी, धरमाता खाडी, राजापुरी खाडी, दिवेआगार खाडी, कुंडलिका खाडी आणि सावित्री खाडी या भागांतील खारफुटींचे अभ्यासकांनी निरीक्षण नोंदवले. खारफुटींंच्या पंधरा प्रजातींपैकी कांदळ (ब्रुगेरिया सिलिंड्रिका), कांदळ (जिम्नोरायझा), भेलांडा (झायलोकार्पस ग्रॅनाटम), इरापू (सायनोमॅट्रा इरिपा) या दुर्मिळ प्रजाती सापडल्या आहेत. या अभ्यासाला २०२० साली सुरुवात झाली परंतु कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाला. सुरुवातीला रेवदांड्याला अभ्यासकांनी भेट दिली असता त्यांना या भागांत वाळू उपसा सुरु असल्याचे दिसून आले. ही बाब तातडीने कांदळवन कक्षाला निदर्शनास आणून दिल्यानंतर वाळू उपसा थांबवण्यात आले.

(हेही वाचा अखेर ‘इंटरनॅशनल हलाल शो’ रद्द, हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनाचा परिणाम)

नवी मुंबई विमानतळ परिसरातील निरीक्षण 

उरण खाडी परिसरातील नवी मुंबई विमानतळ तसेच इतर विकासकामांमुळे खारफुटींची कत्तल तसेच खारफुटीत कचरा तसेच मोठ्या प्रमाणात प्लास्टीक टाकले जाते. खारफुटींमध्ये पाण्याचा प्रवाह थांबल्याने खारफुटी अखेरचा श्वास घेत आहेत. तिवर, सुगंधा, मारंडी या खारफुटींच्या प्रजातीही या भागांत सापडल्या आहेत. खारफुटींच्या अन्य तीन प्रजातींचाही समावेश आहे.

रायगड जिल्ह्यातील इतर भागांतील निरीक्षणे 

  • कलेश्री – वाधव-कलेश्रीवाडी रस्ता बांधकामामुळे तसेच स्थानिकांकडून खारफुटी तोडल्या जात आहेत. या भागांत खारफुटींवर मैदान उभारले जात आहे.
  • डोल्वी – मच्छिमारांनी बोटींसाठी पार्किंगची जागा उभारली
  • रेवस जेट्टी – जेट्टीची जागा वाढवताना तसेच पार्किंगची जागा उभारताना खारफुटी तोडल्या गेल्या
  • रेवदांडा – वाळू उपसा तसेच स्थानिकांनी कचरा खारफुटींमध्ये टाकला होता
  • वाशी निगडी – मासेमारी करता यावी तसेच इंधन म्हणून लाकूड मिळावे यासाठी स्थानिकांनी खारफुटींची कत्तल केली
  • मेंदडी – इंधन म्हणून लाकूड वापरण्यासाठी लोकांनी खारफुटी तोडल्या. मासेमारी जाळीतील टाकाऊ पदार्थ तसेच कचरा या खारफुटींमध्ये टाकला जातो
  • अंबेट – तुटलेल्या खारफुटींची लाकडे स्थानिकांनी इंधन तसेच शेताला कुंपण करुन वापरले
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.