केंद्र सरकारने प्रसूती रजेबाबत शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि भावनांचा विचार करत जन्मानंतर नवजात अर्भक दगावल्यास केंद्र सरकारच्या सेवेतील मातांना ६० दिवसांची रजा देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश कार्मिक व प्रशिक्षण खात्याने काढला आहे. केंद्र सरकारने आपल्या सर्व मंत्रालयांसाठी हा आदेश जारी केला आहे.
( हेही वाचा : आमच्या कमळाला ‘बाई’ म्हणत हिणवता, आम्ही तुम्हाला पेंग्विन सेना म्हणायचं का? शेलारांचे उद्धव ठाकरेंना पत्र)
सरकारचा नवा आदेश काय आहे ?
महिला आधीपासून प्रसूती रजेवर असेल आणि रजेवर असताना महिलेची प्रसूती झाली किंवा बालकाचा मृत्यू झाला तर महिला तात्काळ ६० दिवसांच्या विशेष रजेसाठी अर्ज करू शकते. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. प्रसूतीच्या तारखेपासून २८ दिवसांच्या आत नवजात बालकाचा मृत्यू झाल्यास हा आदेश लागू होईल. मातेच्या मनावर होणारा हा संभाव्य भावनिक आघात लक्षात घेऊन केंद्र सरकारने ६० दिवसांची विशेष प्रसूती रजा देण्याचा निर्णय घेतला आहे.
या असतील अटी
- महिला कर्मचाऱ्यांना दोनपेक्षा कमी मुले आहेत आणि त्यांची प्रसूती अधिकृत रुग्णालयात झाली आहे.
- अधिकृत रुग्णालय म्हणजे सरकारी रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालये जी केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत समाविष्ट आहेत.
- या पॅनेलच्या बाहेरील कोणत्याही खाजगी रुग्णालयात आपत्कालीन प्रसूती झाल्यास प्रमाणापत्र देणे बंधनकारक असेल.