- ऋजुता लुकतुके
रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच UDGAM नावाचं एक मध्यवर्ती पोर्टल सुरू केलं आहे. या पोर्टलवर तुमची वापरात नसलेली बँक खाती आणि पैसे न घेतलेल्या मुदतठेवींची माहिती मिळेल. या पोर्टलच्या माध्यमातून न वठवलेल्या मुदतठेवींचे पैसे कसे मिळवायचे? यासाठी रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच एक मध्यवर्ती वेब पोर्टल सुरू केलं आहे, ज्याचं थोडं विचित्र नाव आहे – UDGAM. याचा शब्दश: अर्थ अनक्लेम्ड डिपॉझिट्स गेटवे टू ॲक्सेस इन्फोर्मेशन असा आहे. म्हणजेच तुमच्याकडून काही बँक खाती वापरलीच गेली नसतील. किंवा काही मुदतठेवी तुम्ही मुदतीनंतरही वठवल्या नसतील, तर अशा सर्व प्रकारच्या बँक खात्याची माहिती तुम्हाला या पोर्टलवर मिळू शकेल.
इतकंच नाही तर अशी खाती पुन्हा सुरू करायची झाल्यास किंवा त्यातील पैसे वळते करायचे झाल्यास काय करायचं याचं मार्गदर्शनही या पोर्टलवर तुम्हाला केलं जाईल. रिझर्व्ह बँक इन्फोर्मेशन टेकनॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन फिनान्शियल टेक्नोलॉजी अँड अलायड सर्व्हिसेस तसंच या पोर्टवर सहभागी असलेल्या सर्व बँका यांनी मिळून हे पोर्टल विकसित केलं आहे. सध्या स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, धनलक्ष्मी बँक, साऊथ इंडियन बँक, डीबीएस आणि सिटी बँक या बँकांमधील खाती या पोर्टलवर तुम्हाला दिसतील. १५ ऑक्टोबरपासून इतर बँकांची खातीही टप्प्या टप्प्याने या पोर्टलवर दिसायला लागतील.
(हेही वाचा – Neymar Al Hilal Deal : सौदी क्लबने नेमारला दिलं २५ बेडरुमचं घर आणि खाजगी वापरासाठी जेट)
अनेकदा आपल्या जुन्या बँक खात्यांबद्दल आपण विसरून जातो. किंवा मुदतठेवींचं सर्टिफिकेट हरवल्यामुळे किंवा आणखी काही कारणांनी ते पैसेही वळते करणं राहून जातं. पण, अशा खात्यांना आता ऑनलाईन पुनरुज्जिवीत करता येणार आहे. किंवा ही खाती बंदही करता येतील. भारतात वापरात नसलेल्या बँक खात्यांचा आकडा खूप मोठा आहे. जागतिक बँकेनं काही वर्षांपूर्वी भारताला त्यासाठी इशाराही दिला होता. देशातील ४३ टक्के खाती वापरातच नसल्याचा ठपका त्यांनी एका अहवालात ठेवला होता. तर सरकारने संसदेत दिलेल्या एका उत्तरादरम्यान वापरात नसलेल्या बँक खात्यात २६,६९७ कोटी रुपये पडून असल्याचं म्हटलं होतं.
हे पैसे बँक खात्यात अडकून पडतात, अर्थव्यवस्थेला त्याचा काही उपयोग होत नाही. तसंच मुदतठेवींबद्दल सांगायचं झालं तर ३५,२१२ कोटी रुपये हे अशा मुदतठेवींमध्ये अडकले आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला अशा खात्यांविषयी काय करता येईल अशी विचारणा केंद्र सरकारने केली होती. आणि यावर्षी एप्रिल महिन्यातल्या पतधोरणाच्या बैठकीत पहिल्यांदा UDGAM पोर्टलचा विषय निघाला होता. २-३ महिन्यात हे पोर्टल वापरासाठी खुलं होईल, असं तेव्हा बँकेकडून पत्रकारांना सांगण्यात आलं होतं. हे पोर्टल कसं वापरायचं याबद्दल अजून पूर्ण स्पष्टता आलेली नाही. तसंच या पोर्टलवरच खातं पुन्हा सुरू करणं किंवा खातं बंद करणं ही कामं होतील का हे ही अजून समजलेलं नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community