छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार, 19 फेब्रुवारी 2022 रोजी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड डॉ. महेंद्र कल्याणकर यांना साथरोग अधिनियम, 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 व महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम, 2020 अन्वये प्राप्त अधिकारातून त्यांनी रायगड जिल्ह्याच्या हद्दीत दि.19 फेब्रुवारी 2022 रोजी “छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यास मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत.
इतक्या भाविकांनी परवानगी
कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाच्या दि.08 व 31 जानेवारी 2022 च्या परिपत्रकांतर्गत दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, दि.19 फेब्रुवारी 2022 रोजी “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” (शिवजयंती) साजरी करत असताना, शिवज्योत वाहण्याकरता 200 भाविकांना व शिवजयंतीकरता 500 भाविकांना परवानगी देण्यात येत आहे. अनेक शिवप्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या शिवनेरी अथवा इतर गड किल्ल्यांवर, जाऊन तारखेनुसार दि.18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-19 चा प्रादूर्भाव टाळण्यासाठी थोड्या प्रमाणात एकत्र न येता “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
अधिक नियमांची भर पडण्याची शक्यता
दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येऊ नये. या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला/प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.
( हेही वाचा: हुश्श! महागाईपासून सूटका, आता वाहनांना पेट्रोल-डिझेलची आवश्यकता नाही! )
…तर दंडात्मक कारवाई
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती/आस्थापना शासनाने यापूर्वी लागू केल्यानुसार दंडात्मक कारवाईस तसेच भारतीय दंड संहिता कलम 188, 269, 270, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतूदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.
Join Our WhatsApp Community