मुंबईतील दिव्यांगांचे स्टॉल्स टाकणार कात!

महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने दिव्यांगांना यापूर्वी दिलेल्या स्टॉल्सच्या बदल्यात हे नवे स्टॉल्स नियोजन विभागाच्यावतीने वाटप होणार आहे.

मुंबईतील रस्त्यांच्या पदपथांवर असलेल्या दिव्यांगांचे स्टॉल्स आता कात टाकणार आहेत. दिव्यांगांना यापूर्वी दिलेल्या टेलिफोन बुथ(स्टॉल्स) आता एकाच आकाराचे आणि एकाच रंगाचे दिसणार आहेत. महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने दिव्यांगांना यापूर्वी दिलेल्या स्टॉल्सच्या बदल्यात हे नवे स्टॉल्स नियोजन विभागाच्यावतीने वाटप होणार असून, यासाठी परवाना विभागाच्यावतीने स्टॉल्स बनवण्याचे काम सुरु आहे.

मंडईत जागा देण्याचा होता निर्णय

मुंबईतील दिव्यांगांना रोजगाराचे एक साधन उपलब्ध व्हावे यासाठी रोटरी क्लबसह अनेक संस्थांच्यावतीने तसेच, लोकप्रतिनिधींच्यावतीने टेलिफोन बुथचे वाटप करण्यात आले. काळाच्या प्रवाहात मोबाईल फोनमुळे सार्वजनिक टेलिफोनचे महत्व कमी झाले आणि याचा परिणाम दिव्यांगांच्या स्टॉल्सवर झाला. त्यामुळे दिव्यांग संघटनेच्या मागणीनुसार, महापालिकेने त्यांना स्टॉल्सवर अन्य वस्तू विकण्यास तसेच झेरॉक्स मशीन टाकण्यास परवानगी दिली आहे. मुंबईत अशाप्रकारे अनेक स्टॉल्स हे रस्त्यांच्या पदपथावर आहेत. महापालिकेच्या तत्कालीन सहआयुक्त निधी चौधरी यांनी दिव्यांगांचे स्टॉल्स रस्त्यांवरून हटवून, त्यांना मंडईत जागा देण्याचा निर्णय घेतला होता. फेरीवाला धोरणाचा भाग म्हणून चौधरी यांनी हा विचार केला होता. पण पुढे त्यांची बदली झाली आणि फेरीवाला धोरण पुन्हा बासनात गुंडाळले गेले आहे.

(हेही वाचा: महापालिकेच्या आठ योध्दयांचा सन्मान!)

बैठकीत मंजुरी

मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी विविध योजना आखल्या जात आहेत. त्याअंतर्गत दिव्यांगांना चार चाकी स्कूटर तसेच, झेरॉक्स मशीन उपलब्ध करून देण्याची योजना प्रगतीपथावर आहे. दिव्यांगांना स्टॉल्सचे नुतनीकरण करण्यासाठी नियोजन विभागाच्यावतीने कोट्यावधी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पण दिव्यांगांच्या स्टॉल्सबाबतीत पूर्ण कार्यवाही ही परवाना अधिक्षक यांच्या खात्यामार्फत करण्यात येणार असल्याने, याबाबतचा दोन कोटी रुपयांचा निधी नियोजन विभागाने परवाना विभागाकडे वळता केला आहे. याला बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

लवकरच पुढील कार्यवाही

नियोजन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ.संगिता हसनाळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी दिव्यांगांना दिलेल्या स्टॉल्सचे नुतनीकरण करून ते एकाच रंगाचे, एकाच आकाराचे तसेच, एकाच उंचीचे अशाप्रकारे त्याचे डिझाईन करून ते उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठीचा निधी परवाना विभागाकडे स्थानांतरीत करण्यात आला आहे. तर, परवाना विभागाचे अधिक्षक शरद बांडे यांनी दिव्यांगांच्या स्टॉल्सचे डिझाईन बनवण्यात येणार असून, दिव्यांगांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करूनच हे डिझाईन अंतिम केले जाणार आहे. त्यामुळे ज्या स्टॉल्सचे परवाने आहेत, त्या स्टॉल्सधारकांना हे उपलब्ध करून दिले जातील. नियोजन विभागाच्या माध्यमातून पुढील कार्यवाही होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here