रेमडेसिवीरसाठीची धावपळ संपणार… काय आहेत राज्य शासनाच्या सूचना?

राज्य शासनाने तातडीने याबाबत परिपत्रक जारी करुन प्रत्येक रुग्णालयांना आता स्वत:च रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना राज्य शासनाने केल्या आहेत.

168

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला आहे. आता अखेर उपचार करणाऱ्या रुग्णालयावर हे इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. खाजगी रुग्णालयाने आपल्या पेशंटसाठी आपल्या भागातील शासकीय औषध प्रशासन व पुरवठा विभागाकडे समन्वय राखून, स्वत:हून रेमडेसिवीर इंजेक्शनची व्यवस्था केली पाहिजे, अशा प्रकारचे निर्देशच राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी जारी केले आहेत.

काय आहे निर्णय?

मुंबईसह राज्यात मागील मार्च महिन्यापासून अचानकपणे कोविडबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे बहुतांशी रुग्ण खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल झाले असून, बाधित रुग्णांवर उपचार करताना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला आहे. खाजगी रुग्णालयांकडून रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन आणून देण्याची मागणी होत होती. पण हे इंजेक्शन कुठे आणि कशाप्रकारे मिळवायचे याची माहिती नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत होती. तसेच प्रत्येक औषधांच्या दुकानांवर यासाठी गर्दी होत होती. या तुटवड्यामुळे वेळीच हे इंजेक्शन प्राप्त न झाल्याने अनेक रुग्णांनी जीव सोडले. त्यामुळे अखेर राज्य शासनाने तातडीने याबाबत परिपत्रक जारी करुन प्रत्येक रुग्णालयांना आता स्वत:च रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना राज्य शासनाने केल्या आहेत.

(हेही वाचाः रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना ‘टोचले’!)

रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ थांबणार

आरोग्य विभागाच्यावतीने शनिवारी १० एप्रिल रोजी याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे ११ एप्रिलपासून हे नियम लागू झाल्यामुळे, रुग्णांना किंवा नातेवाईकांना आता खाजगी रुग्णालयांमधून रेमडेसिवीर इंजेक्शन बाहेरुन आणण्याची चिठ्ठी दिली जाणार नाही. त्यामुळे एकप्रकारे रुग्णांच्या नातेवाईकांची हे इंजेक्शन मिळवण्यासाठी होणारी धावपळ कमी होणार असून, रुग्णांनाही वेळेत इंजेक्शन मिळाल्याने त्यांच्यावर पुढील उपचार करणेही रुग्णालयाला सोपे जाणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.