मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या मुलांसाठी टॅबची खरेदी करण्यात येत असून तब्बल १९,४०१ टॅब खरेदी केली जात आहे. महापालिका शाळांमधील मराठी, हिंदी, इंग्रजी आणि ऊर्दु माध्यमातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षांसाठी या टॅबचे वाटप केले जाणार होते. या एका टॅबसाठी महापालिका १७ हजार ४०० रुपये खर्च करत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणासाठी दहावीच्या मुलांसाठी चालू शैक्षणिक वर्षामध्ये या टॅबचे वाटप करणे अपेक्षित असले तरी खरेदीला झालेल्या विलंबामुळे नवीन शैक्षणिक वर्षातच हे नवीन टॅब मुलांच्या हाती पडण्याची शक्यता आहे.
इडुसपार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात येत असून यापूर्वी आठवी, नववी आणि दहावीच्या मुलांसाठी सुमारे ४४ हजार टॅबची खरेदी केल्यानंतर आता दहावीच्या मुलांसाठी आणखी १९ हजार ४०१ टॅबची खरेदी केली जात आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी ही खरेदी केली जाणार होती. परंतु कोरोनामुळे या खरेदीला विलंब झाला असून यासाठी मागवलेल्या निविदेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये पात्र कंपनीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये १९ हजार ४०१ टॅबच्या खरेदीसाठी इडुसपार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली आहे. सन २०२१-२६ या कालावधीसाठी या टॅबची खरेदी करण्यात येत आहे. यामध्ये एका टॅबची खरेदी एक वर्षाच्या हमी कालावधीसह ११ हजार रुपयांमध्ये खरेदी केली जात आहे. याशिवाय चार वर्षांची जास्त गॅरंटी, अभ्यासक्रम तयार करणे व टॅबमध्ये अपलोड करणे यासाठी अधिक ६ हजार ४०० रुपये याप्रमाणे एकूण १७ हजार ४०० रुपये खर्च केला जाणार आहे.
(हेही वाचा रुग्ण वाढ तरीही रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी)
३८ कोटी ७२ लाख २४ हजार ५५९ रुपये खर्च करणार
त्यामुळे एकूण १९ हजार ४०१ टॅबच्या खरेदीसाठी ३८ कोटी ७२ लाख २४ हजार ५५९ रुपये खर्च केला जाणार आहे. महापालिका शाळांमधील दहावीच्या मुलांना पाठ्यक्रम समाविष्ट असलेले हे टॅब असून सध्या जुने टॅब हे दहावीच्या विद्यार्थ्यांकडे आहेत. त्यामुळे टॅबअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नसून जुन्या टॅबवर त्यांचा अभ्यासक्रम सुरु आहे. तर नवीन टॅब हे आगामी शैक्षणिक वर्षापासून वितरीत केले जातील, असे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community