मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांवर नव्याने मलमपट्टी करण्यासाठी पाच प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून यावर माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी जोरदार टीका केली. खड्डयांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयोग करत एकप्रकारे महापालिका प्रशासनाने मुख्यमंत्र्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप केला आहे. कोल्डमिक्सच्या नावाखाली आधी सिंघल मिक्स आले होते, आणि वेलू मिक्स आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
( हेही वाचा : पर्यटन मंत्रालयाशी संबंधित ५९६ कोटींच्या कामांना स्थगिती )
मुंबईच्या रस्त्यांवर कोल्डमिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून आजवर महापालिकेच्यावतीने या तंत्राचा वापर करताना तत्कालिन स्थायी समिती सदस्यांसह महापालिका सभागृहातही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हे तंत्र पूर्णपणे अयशस्वी असल्याचा आरोप केला होता. परंतु हे तंत्र चांगल्या प्रतीचे असल्याचा दावा करत प्रशासनाने नगरसेवकांची मागणी धुडकावून लावली होती. परंतु मागील काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्डे बुजवण्याच्या मुद्दयावर प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर, मुंबईच्या रस्त्यांवर रॅपिड हार्डिंग काँक्रिट, एम ६० काँक्रिट भरून त्यावर स्टील प्लेट अंथरणे, जिओ पॉलिमर काँक्रिट आणि पेव्हर ब्लॉक या चार पद्धतींचा प्रायोगिक तत्त्वावर करत याचे प्रात्यक्षिक चार ठिकाणी करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांची फसवणूक
याबाबत बोलतांना मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पाच वर्षे जे तंत्र चांगल्या प्रतीचे असल्याचा दावा नगरसेवकांसमोर करणाऱ्या प्रशासनाला आता या तंत्रज्ञानाला पर्याय का देण्याची गरज भासली असा सवाल सवाल केला. खड्डेमुक्त रस्ते व्हावे असे सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींची इच्छा आहे. परंतु प्रशासनाची मानसिकता नसून आता चार नवीन तंत्राचा वापर प्रायोगिक तत्वावर करून त्यांनी यापूर्वी कोल्डमिक्सचा वापर अयशस्वी ठरला असल्याचे स्पष्ट केले. राज्याचे मुख्यमंत्री नवीन असल्याने त्यांच्यासाठी टेक्नॉलॉजी वापरण्याच्या नावाखाली एकप्रकारे मुख्यमंत्र्यांचीच फसवणूक प्रशासन करत असल्याचा आरोप केला.
Join Our WhatsApp Community