गेल्या सोमवारी चंद्रपूरात नागभिड येथे वाघाच्या हल्ल्यात एका माणसाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या वाघाला शोधण्यासाठी तसेच त्याची ओळख पटवून घेण्यासाठी वनविभाागाने ठिकठिकाणी कॅमेरा ट्रेप लावले होते. मात्र हल्ल्यात स्थानिक वाघ आढळून आला नाही. चंद्रपूरात नजीकच्या व्याघ्र प्रकल्पातून नव्याच वाघाचा प्रवेश झाल्याचे वनाधिका-यांच्या लक्षात आले. हा वाघ ताडोबा किंवा उम्रेडमधून स्थलांतरित झाला असावा, असा प्राथमिक अंदाज चंद्रपूर वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक दिपेश मेहता यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा – केतकी पुन्हा भडकली; म्हणाली, “… आणि धर्माची माती करु नका”)
गेल्या आठवड्यात चंद्रपूरात चारवेळा वाघाचे हल्ले झालेत. या चार हल्ल्यांचे ठिकाण वेगवेगळे होते. चार हल्ल्यांपैकी मूल येथील हल्ल्यात वाघाने एकाचवेळी दोन गुराख्यांचा जीव घेतला. या हल्ल्यांची सुरुवात १७ ऑक्टोबर रोजी नागभिड येथून सुरु झाली. सोमवारी नागभिड येथील तळोदी विभातील कम्पाउण्ड क्रमांक ७६९ येथे वाघाच्या हल्ल्यात सत्यवान पंढरी मेश्राम (६५) यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आठवड्याभरात चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्याच्या अजून तीन घटना दिसून आल्या. या हल्ल्यानंतर मूल तसेच ब्रह्मपुरीतील हल्लेखोर वाघाचा जेरबंद करण्याचा वनाधिका-यांचा विचार सुरु आहे. मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती वरिष्ठ वनाधिका-यांकडून मिळाली.
राज्यातील वाघांची एकूण संख्या पाहता जवळपास ९० टक्क्यांहून अधिक वाघ एकट्या चंद्रपूरात आढळून येत आहेत. वाघांना प्रदेश कमी पडत असल्याने स्थलांतर तसेच मर्यादित भूप्रदेशाच्या समस्येमुळे मानव-प्राणी संघर्ष वर्षागणिक वाढत आहे. चंद्रपूरात तसेच विदर्भातील वाघांची वाढती संख्या लक्षात घेता लवकरच प्रायोगिक तत्त्वावर पाच वाघिणींचे रेडिओ कॉलर करुन नवेगाव नागझिरा प्रकल्पात स्थलांतर केले जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच राधानगरी अभयारण्यातही विदर्भातील वाघांचे स्थलांतर करण्याचा वनविभागाचा विचार सुरु आहे.
Join Our WhatsApp Community