मुंबईतील क्षय रुग्णांवर नवीन उपचार पद्धतीचा वापर!

भारतात एकूण ९ ठिकाणी या औषधोपचार पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. या ९ पैकी मुंबईत २ केंद्र आहेत.

क्षयरोगाचा विचार करता, औषधांनाही दाद न देणारा क्षयरोग हा दर दोन मिनिटात तीन क्षयरोग्यांचा बळी घेतो, ही वस्तुस्थिती लक्षात घेता, औषध प्रतिरोधी म्हणजेच औषधांनाही न जुमानणारा क्षयरोग (Drug Resistant TB) हा अधिक घातक आहे. अशा स्थितीत क्षयरुग्णांना दिलासा देवू शकणारी, त्यांना आशेचा किरण दाखवणारी नवीन औषधोपचार पद्धती उपलब्ध झाली आहे. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांनी हीच औषधोपचार पद्धती आता मुंबईतही मंगळवारपासून सुरु करण्यात आली आहे. गोवंडीतील पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात भारतातील सर्वात पहिल्या रुग्णावर एम-बीपाल पद्धतीने औषधोपचार सुरु करण्यात आला आहे.

मिश्र औषध पद्धती सुरु करण्यात आली!

भारतात एकूण ९ ठिकाणी या औषधोपचार पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. या ९ पैकी मुंबईत २ केंद्र आहेत. गोवंडी येथील पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी महानगरपालिका रुग्णालय व घाटकोपरचे सर्वोदय रुग्णालय या दोन ठिकाणी ही सुविधा देण्यात आली आहे. औषधांनाही दाद न देणाऱ्या क्षयरोगांवरील उपचार पद्धती शोधणे आणि ती यशस्वी करुन क्षयरुग्णांना दिलासा देणे, हे वैद्यकीय क्षेत्रासमोर आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जावू शकणारी व अतितीव्र औषध प्रतिरोधी क्षयरोगाच्या पूर्व अवस्थेत असलेल्या (Pre-XDR TB) रुग्णांसाठी आशेचा किरण ठरु शकेल अशी नवीन औषधोपचार पद्धती उपलब्ध झाली आहे. एमबीपाल (M-BPal Trial) या नावाने सदर औषधोपचार पद्धतीचा अवलंब या दोन्ही रुग्णालयात करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या गोवंडी स्थित पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी महानगरपालिका रुग्णालयातील एका रुग्णास या मिश्र औषध पद्धती मंगळवारपासून सुरु करण्यात आली आहे. संपूर्ण भारतातून हे औषध घेणारा हा पहिला रुग्ण ठरला आहे.

(हेही वाचा : ‘या’ तारखेपासून सुरू होणार राज्यातील महाविद्यालये! राज्य सरकारचा मोठा निर्णय)

नवीन औषधोपचार क्षयरुग्णांसाठी अधिक सुसह्य ठरेल!

दक्षिण आफ्रिका या देशात निक्स ट्रायल या नावाने ही पद्धती सुमारे ९१ टक्के यशस्वी झाली आहे. यामध्ये अतितीव्र औषध प्रतिरोधी क्षयरोगाच्या पूर्व अवस्थेत असलेल्या (Pre-XDR TB) रुग्णांना बेडाक्विलीन, प्रिटोमॅनिड, लिनेझोलाईड या तीन औषधांची प्रत्येकी एक गोळी एका दिवशी दिली जाते. यापूर्वीच्या उपचार पद्धतीमध्ये निरनिराळ्या ४ ते ५ औषधे मिळून दिवसभरात सुमारे १० ते १२ गोळ्या रुग्णांना देण्यात येत होत्या. तसेच पूर्वीच्या सुमारे १८ ते २४ महिने कालावधीच्या तुलनेत ही नवीन उपचार पद्धती ६ महिन्यांमध्ये गुणकारी सिद्ध होवू शकते. या दोन्ही बाबी लक्षात घेता, सदर नवीन औषधोपचार संबंधित क्षयरुग्णांसाठी अधिक सुसह्य ठरेल, अशी वैद्यकीय तज्ज्ञांना अपेक्षा आहे.

भारतात केवळ ९ ठिकाणी औषधोपचार पद्धती

या औषधोपचार पद्धतीचे भारतातील मुख्य अन्वेषक म्हणून कार्यरत असलेले डॉ. विकास ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही उपचार सुरु करण्यात आली आहे. संपूर्ण भारताचा विचार करता प्रारंभी एकूण ९ ठिकाणी ही औषधोपचार पद्धती संबंधित रुग्णांना मिळणार आहे. यामध्ये मुंबईतील गोवंडी येथील पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी महानगरपालिका रुग्णालय, घाटकोपरचे सर्वोदय रुग्णालय तर लखनऊमध्ये केजीएमयू, आग्रामध्ये एस.एन. वैद्यकीय महाविद्यालय, अहमदाबादचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, सुरतमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दिल्लीतील एनआयटीआरडी, आरबीआयपीएमटी, मदुराईतील राजाजी रूग्णालय या वैद्यकीय संस्थांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here