न्युमोनियापासून रक्षणासाठी बालकांच्या लसीकरणात नव्या लसीचा समावेश!

बालकांना पीसीव्ही लसीच्या तीन मात्रा दिल्या जाणार असून जन्मानंतर सहाव्या आठवड्यात 14व्या आठवड्यात आणि नवव्या महिन्यात ही लस दिली जाणार आहे.

79

बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात  आला असून दरवर्षी सुमारे 19 लाख बालकांना ही लस दिली जाणार आहे, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

पीसीव्ही लसीकरणासाठी प्रशिक्षण पूर्ण- आरोग्यमंत्री राजेश टोपे

बालकांना बीसीजी, पोलिओ, रोटाव्हायरस, पेंटाव्हेलेंट, गोवर रुबेला, जेई, डीपीटी इत्यादी लसी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जातात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बालकांचे न्युमोनियापासून संरक्षण करण्याकरीता पीसीव्ही लस दिली जाणार आहे. राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत आजपासून या लसीचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

(हेही वाचा : मुंबईत १२ रुग्णालयांमधील ऑक्सिजन प्लांट कधी होणार सुरू?)

अर्भक मृत्यू रोखण्यासाठी पीसीव्ही लस उपयुक्त – डॉ. प्रदीप व्यास

बालकांना पीसीव्ही लसीच्या तीन मात्रा दिल्या जाणार असून जन्मानंतर सहाव्या आठवड्यात 14व्या आठवड्यात आणि नवव्या महिन्यात दिली जाणार आहे. नियमित लसीकरण कार्यक्रमात ही लस देण्यास सुरुवात झाल्यानंतर अर्भकांच्या मृत्युच्या प्रमाणात घट होण्यास मदत होईल, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. या लसी संदर्भात प्रशिक्षण आणि मार्गदर्शक सूचना जिल्ह्यांना देण्यात आले असून जाणीव,, जागृतीसाठी पोस्टर्स, बॅनर्स तयार करण्यात आल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.

शासकीय आरोग्य संस्था, रुग्णालयात मोफत लस उपलब्ध

स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी बॅक्टेरीयामुळे हा आजार होतो. यामुळे श्वसन मार्गाला संसर्ग होऊन फुप्फुसाला सुज येते. गंभीर न्युमोनिया होण्याचा धोका दोन वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतो. संसर्गामुळे एक वर्षाच्या आतील मुलांमध्ये डायरिया आणि न्युमोनिया होऊन ते  दगावण्याचे प्रमाण लक्षात घेऊन राज्य शासनाने डायरीया प्रतिबंधासाठी रोटा व्हायरस लस तर आता न्युमोनिया प्रतिबंधाकरीता पीसीव्ही लसीचा समावेश केलेला आहे. दुर्गम तसेच अतिवृष्टीचे प्रमाण अधिक असलेल्या भागात जेथे कोंदट वातावरणामुळे बालकांमध्ये न्युमोनियाचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते.  अशा भागातील बालकांना ही लस या आजारापासून रोखण्यास महत्वपूर्ण ठरणार असल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.  खाजगी रुग्णालयांमध्ये ही लस सशुल्क उपलब्ध असून आता मात्र शासकीय आरोग्य संस्था, रुग्णालय तसेच लसीकरण सत्र आयोजित केलेल्या ठिकाणी सर्वांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे अतिरिक्त संचालक डॉ. डी.एन. पाटील यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.