50 वर्षांवरील पोलिसांसाठी कामाच्या नवीन वेळा… मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय

पोलिसांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मुंबई पोलिस दलाचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पोलिसांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेण्यासाठी निर्णय घेतला आहे. ५० पेक्षा अधिक वयोगटातील पोलिस शिपाई ते जमादार, तसेच गंभीर आजार असणाऱ्या पोलिसांना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी आणि दिवसातून केवळ १२ तासच काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच मुंबई पासून दूर राहणाऱ्या पोलिस अंमलदार यांची पोलिस ठाण्याच्या जवळपास राहण्याची सोय करण्यात यावी, अशी सूचना प्रत्येक पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना देण्यात आली आहे. पोलिसांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनापासून पोलिसांचा बचाव करण्यासाठी निर्णय

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना, पोलिस दलातील कर्मचा-यांना देखील त्याची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. मागील महिन्याभरात राज्यासह ठाणे, मुंबई पोलिस दलांत अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी काहींचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा धोका हा ५० वर्ष वयाच्या पुढच्या, तसेच गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना सर्वाधिक असल्यामुळे, या वयोगटातील व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. पोलिस दलात देखील गेल्या वर्षी कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे वयोगट ५०पेक्षा अधिक होते. तर काहींना उच्च रक्तदाब, मधुमेह इ. गंभीर आजार होते. या दृष्टीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पोलिसांच्या प्रकृतीची काळजी घेत, मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचाः पोलिसांना धोका वाढला, मुंबईत कोरोनाने १०१ पोलिसांचा मृत्यू!)

काय असणार निर्णय?

  • पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या ५०पेक्षा अधिक वय असणाऱ्या पोलिस अंमलदार ते जमादार(सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक) यांना १२ तासांची ड्यूटी देण्यात येणार. तसेच त्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळणार.
  • पोलिस ठाणे येथे कार्यरत असलेले अंमलदार ते जमादार यापैकी कुणाला गंभीर आजार (मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब)असल्यास त्यांना १२ तासांचे कर्तव्य आणि आठवड्यातून दोन दिवस सुट्टी देण्यात येणार.
  • पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे, मात्र १ तासाच्या वर प्रवास करुन येणाऱ्या पोलिस अंमलदार यांची राहण्याची सोय कार्यरत असणाऱ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात यावी.
  • पोलिसांना राहत्या ठिकाणी मास्क सॅनिटायझर, सामाजिक अंतर राखता येईल याची व्यवस्था करुन द्यावी.
  • त्यांच्या कुटुंबांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी ही उपाययोजना करण्यात यावी. ही जबाबदारी संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची असेल.
  • तसेच अशा अंमलदारांना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी देण्यात यावी, जेणेकरुन ते दोन दिवस कुटुंबासोबत असतील.
  • ज्या अंमलदारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यांची १२ तास कर्तव्य संपल्यानंतर ते अंमलदार त्याच्या राहत्या ठिकाणी खातरजमा करावी.

(हेही वाचाः पोलिसांना आता ‘गर्मी में भी थंडी का एहसास’!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here