मागील 2 वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला. या संकटाला आळा घालण्यासाठी शासन-प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यातून मार्ग काढत जनजीवन पूर्ववत जरी झाले असले तरी ‘ओमायक्रॉन’ सारख्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अशा वेळी 31 डिसेंबरला पार्ट्यांच्या माध्यमातून ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग पसरण्याची शक्यताही अधिक आहे. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही. त्यामुळे ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणा-या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरी करणावर (‘सेलिब्रेशन’वर) बंदी घालावी, तसेच ख्रिस्ती नववर्षारंभाच्या नावाखाली 31 डिसेंबरच्या निमित्ताने गडकोट, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक अन् सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धुम्रपान, पार्ट्या करताना होणारे अपप्रकार रोखले जावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींसह विविध धर्मप्रेमींच्या वतीने मुंबई जिल्ह्यात घाटकोपर, कांजूरमार्ग, धारावी, भायखळा, लालबाग, काळाचौकी, जोगेश्वरी, नेरूळ, नालासोपारा आणि विरार या पोलीस ठाण्यांत तर मुलुंड आणि अंधेरी येथील तहसीलदार कार्यालयांत निवेदने देण्यात आली. याच आशयाची निवेदने मुंबई जिल्ह्यातील काही शाळा आणि शिकवणीवर्गांमध्येही देण्यात आली.
(हेही वाचा नवीन वर्षांत ‘या’ एक्सप्रेसचे वेळापत्रक आणि गाडीची संरचना बदलणार)
नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करण्याविषयी विविध माध्यमांतून प्रबोधन
हिंदू बांधवांनी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नव्हे; हिंदु संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करावे ! असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई आणि नवी मुंबई भागात गेल्या 2 आठवड्यात विविध ठिकाणी व्याख्याने घेऊन आणि साप्ताहिक धर्मशिक्षणवर्गांतून करण्यात आले. तसेच फलक प्रसिद्धी, सोशल मीडिया आदि माध्यमातूनही प्रबोधन करण्यात आले. 1 जानेवारी खरेतर ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ आहे. आजमितीला जगभरात ख्रिस्ती राष्ट्रे बहुसंख्य असल्याने आणि या राष्ट्रांनी जगातील बहुसंख्य देशांवर आपले अधिपत्य गाजवल्याने तेथील संस्कृतीचा पगडा जगभर पहायला मिळतो. त्यामुळे ‘1 जानेवारी हे जागतिक नववर्ष आहे’, असा गैरसमज निर्माण झाला आहे; भारतीय संस्कृतीनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करणे हे नैसर्गिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक या सर्वच दृष्टीने श्रेयस्कर आणि फायदेशीर आहे. प्रतिवर्षी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 31 डिसेंबरच्या निमित्ताने ‘संस्कृतीरक्षण मोहीम’ राबवण्यात येते. सर्वत्रच्या हिंदूंनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी 9967671027 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community