सुनील मानेला २८ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी!

मनसुख हिरेन संशयित मृत्यू प्रकरणात एनआयएने मुंबई पोलिस दलातील पोलिस निरीक्षक सुनील मानेला गुरुवारी रात्री अटक केली.

138

मनसुख हिरेन संशयित मृत्यू प्रकरणी एनआयएने गुरुवारी रात्री उशिरा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील माने याला अटक केली. त्यानंतर त्याला शुक्रवारी, २३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास एनआयए स्पेशल कोर्टात हजर करण्यात आले. तेव्हा एनआयए कोर्टाने सुनील मानेला २८ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली. मनसुखला हत्येच्या दिवशी फोन करणारा विनायक शिंदे नसून सुनील मानेच होता. त्यानेच फोन करून मनसुखला हत्येच्या दिवशी बोलावले होते, मनसुखच्या हत्येवेळी माने हा घटनास्थळी होता, अशी माहिती एनआयएने कोर्टात दिली.

मानेची अटक चुकीची असल्याचा युक्तीवाद!

एनआयएने पहाटे माने याला अटक का केली? हे कायद्याने चुकीचे आहे. त्याला तातडीने जामीन मिळावा. 48 तासांच्या चौकशीनंतर अटक करणे चुकीचे आहे. एनआयएकडे कुठलेही पुरावे नाहीत. मानेचा या गुन्ह्यात सहभाग नाही. फक्त तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर ही अटक करण्यात आली असल्याचा युक्तीवाद मानेच्या वकिलांनी केला. त्यावर मनसुखच्या हत्येच्या गुन्ह्यात मानेचा स्पष्ट सहभाग असल्याचे  ATS तपासात समोर आले आहे. त्याच बरोबर काही तांत्रिक पुरावेही माने विरोधात आढळून आल्यानेच ही अटकेची कारवाई केली असल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले. मानेला मानसिक त्रास देऊ नये आणि दररोज मेडिकल होईल का आणि त्याची एक कॉपी आम्हालाही द्यावी. रिमांड कॉपी तरी देण्यात यावी, अशी मानेच्या वकिलांनी मागणी केली.

(हेही वाचा :मनसुख हिरेन हत्या प्रकरण : पोलिस निरीक्षक सुनील मानेला अटक )

मनसुख संशयित मृत्यू प्रकरणातील तिसरी अटक!

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ मिळून आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन संशयित मृत्यू प्रकरणात एनआयएने मुंबई पोलिस दलातील पोलिस निरीक्षक सुनील मानेला गुरुवारी रात्री अटक केली. मनसुख हत्या प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. मुकेश अंबानीच्या घराजवळ मिळून आलेली स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा ५ मार्च रोजी मृतदेह मुंब्रा खाडीत मिळून आला होता. मनसुख यांची हत्या करण्यात आली, असा आरोप एनआयएचा आहे. या आरोपातील सचिन वाझे हा मुख्य आरोपी असून त्याला मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी सचिन वाझे याला मुंबई पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटचे तत्कालीन प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील माने याने मदत केली होती. या प्रकरणी मानेला राज्यांच्या एटीएस पथकाने चौकशीला बोलावले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.