…तर मग नऊ महिन्यांखालील बाळांनाही मिळणार गोवर प्रतिबंधात्मक लस

139

राज्यासह बिहार, गुजरात, हरयाणा, झारखड आणि केरळमध्येही आता गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत गोवरची साथ वाढत असताना बालकांचा मृत्यूही होत असल्याने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने चिंता व्यक्त केली. मुंबई व्यतिरिक्त राज्यात इतरही भागांत गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या गोवरच्या केसेसला आळा घालण्यासाठी ज्या भागांत गोवरचे १० टक्के रुग्ण नऊ महिन्यांच्याखाली दिसून येत आहेत, अशा भागांत गोवर प्रतिबंधात्मक विशेष लस नऊ महिन्यांखालील बालकांनाही देण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना केल्या आहेत.

गोवर आणि रुबेला आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी जागतिक लसीकरण मोहिमेत ही अतिरिक्त लस सूचवण्यात आली आहे. ही लस ९ ते १२ महिन्यांतील गोवर प्रतिबंधात्मक पहिल्या मात्रेच्या लसीकरणाअगोदर ६ ते ९ महिन्यांच्या बाळांना देता येते. गोवरचा उद्रेक झालेल्या भागांत ही लस देण्याची सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने राज्यांना केली आहे. मात्र ही अतिरिक्त लस कधीपासून दिली जाईल, याबाबत पालिका तसेच राज्य विभागाकडून नेमकी कल्पना दिली गेली नाही.

(हेही वाचा उद्धवा अजब तुझी सेना! आजोबांनी केला होता परप्रांतीयांना विरोध, नातवाचे मात्र लोटांगण)

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या महत्वाच्या सूचना

  • गोवरची साथ नोव्हेंबर ते मार्च महिन्यापर्यंत आढळते. त्यामुळे संशयित रुग्ण तातडीने शोधा
  • गोवरचा उद्रेक झालेल्या भागांत ६ ते ५ वर्षांपर्यंत अतिरिक्त लसीसह गोवरच्या दोन्ही मात्रांच्या लसीकरणाची मोहिम योग्य पद्धतीने राबवा
  • गोवरची साथ आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या पुढाकाराने जिल्हा टास्क फोर्सची स्थापना करुन दर दिवसाला आणि प्रत्येक आठवड्याला लसीकरण मोहिमेची माहिती घ्यावी
  • हा आजार कमी वजनाच्या बालकांना किंवा कुपोषित मुलांना पटकन होतो. त्यामुळे या मुलांचा शोध घेऊन सकर आहार तसेच अ जीवनसत्त्वाच्या गोळ्या दिल्या जाव्या
  • निदान झालेल्या रुग्णांना आठवडाभर आयसोलेशन विभागात उपचार दिले जावेत. घरगुती उपचारांच्यावेळी अ जीवनसत्वाच्या दोन्ही मात्रा तसेच सकस आहाराकडे लक्ष असावे
  • जुलाब, श्वसनाचा त्रास तसेच छातीत दुखत असल्यास रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे

राज्य आरोग्य विभागाची भूमिका

केंद्राकडून अतिरिक्त लस गोवरची साथ आढळलेल्या भागांतील बालकांना देण्याबाबत सूचवण्यात आले आहे. ही लस बंधनकारक नाही. याबाबत विचारविनिमय करुन भूमिका घेतली जाईल.
– संजय खंदारे, प्रधान मुख्य सचिव, राज्य आरोग्य विभाग

या सूचनांबाबत आम्ही नक्कीच आमचा प्रतिसाद कळवू, असे महापालिकेचे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त, पश्चिम उपनगरे संजीव कुमार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.