- ऋजुता लुकतुके
होंडा आणि निस्सान या जपानमधील आघाडीच्या कार उत्पादक कंपन्या आहेत. पण, इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या प्रसारामुळे या कंपन्यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे. अशावेळी इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत एकत्र प्रयत्न करण्याच्या दृष्टीने दोन्ही कंपन्यांनी परस्पर विलिनीकरणाची बोलणी सुरू केल्याचं समजतंय. खासकरून अमेरिका आणि चीनमधील बाजारपेठेत या कंपन्यांचं वर्चस्व कमी झालं आहे. (Nissan-Honda Merger)
मार्च २०२४ मध्येच दोन्ही कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार उत्पादनासाठी एकत्र येण्याचा विचार सुरू केला होता. सध्या होंडा आणि निस्सान या जपानमधील क्रमांक दोन आणि तीनच्या कंपन्या आहेत. दोघांनी इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पासाठी एकत्र येत असल्याचं मान्य केलं असलं तरी विलिनीकरणावर दोन्ही कंपन्यांकडून कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाही. जपानी टीव्ही वाहिनी टीबीएसने दिलेल्या बातमीनुसार, विलिनीकरणाची बोलणी अगदी प्राथमिक टप्प्यात आहेत आणि ते होईल की नाही, हे अजून स्पष्ट नाही. पण, विलिनीकरण झालं तर त्यातून एका नवीन कंपनीच्या निर्मितीचा विचार होऊ शकतो. (Nissan-Honda Merger)
(हेही वाचा – ICC Test Championship : आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आता भारताला किती संधी?)
कंपन्यांनी विलिनीकरणाचा प्रस्ताव मान्य केला तरी तो जपानमध्ये तितका सोपा असणार नाही. कारण, विलिनीकरणामुळे देशात मोठ्या प्रमाणावर नोकर कपात होईल आणि सध्याच्या जपान सरकारच्या धोरणाच्या हे विरोधात असेल. त्यामुळे या कंपन्यांना सरकारी विरोधालाही सामोरं जावं लागू शकतं. या सगळ्या शक्यतांचा विचार करूनच कंपन्या पुढे जातील हे नक्की आहे. (Nissan-Honda Merger)
दुसरा मुद्दा आहे तो निस्सान कंपनीच्या फ्रेंच कंपनी रेनॉ बरोबर सध्या अस्तित्वात असलेल्या कराराचा. या गोष्टी तपासून पाहिल्याशिवाय दोन्ही कंपन्यांना पुढे जाता येणार नाही. पण, कार उत्पादक कंपन्यांसाठी मात्र ही एक मोठी बातमी ठरली आहे. पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांची लोकप्रियता कमी होतेय. आणि त्यामुळे जुन्या काळातील मोठ्या कंपन्यांसमोर टिकून राहण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. (Nissan-Honda Merger)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community