केंद्राचा अर्थसंकल्प मांडल्यावर मोदी सरकारवर आता विरोधकांनी टीकेची झोड उगारली आहे. २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात विविध योजना जाहीर केल्या आहेत का, असा सवाल केला जात आहे. त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावर कडक शब्दांत उत्तर दिले.
आम्ही राजकारणी आहोत, साधू-संत नाही. आम्ही इथे पूजा-पाठ करायला आलो नाहीत. आम्ही निवडणूक जिंकण्यासाठीच आलो आहोत. चांगले काम केले तर पुढे जिंकू. जो चांगले काम करेल, जनता त्यालाच पुढच्या वेळेस निवडून देईल. म्हणूनच आम्ही काम करतो आणि निवडून येतो, असे गडकरी म्हणाले. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मोफत अन्नधान्य, करमाफी आणि इतर दिलासे दिले जात आहेत? या प्रश्नावर गडकरी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
भारतातील रस्ते आणि पायाभूत सुविधा यूएसएप्रमाणे होणार
यावर्षी 9 राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. निवडणुका आल्या की प्रकल्प सुरू होतात, असे विरोधकांचे म्हणणे आहे. यावर गडकरी म्हणाले की, असे कोणते राज्य आहे जिथे रस्ते बांधले जात नाहीत. सर्व राज्यांमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत. प्रत्येक राज्यात रस्ते बांधले जात आहेत. एकाही राज्याचे नाव सांगा, जिथे रस्ता बांधला जात नाही. सर्व राज्यांमध्ये रस्ते बांधले जात आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. मी निवडणुकीनुसार विचार करत नाही आणि सांगतही नाही. मी काम करत राहतो आणि काम करत राहायलाच हवे. मला माझे टार्गेट सांगण्याची गरज नाही. 2024 च्या अखेरपर्यंत भारतातील रस्ते आणि पायाभूत सुविधा यूएसएप्रमाणे होतील, हे आमचे टार्गेट आहे. आम्ही ग्रीन एक्सप्रेस हायवे बनवत आहोत. दिल्ली-मुंबई रस्ता तयार होत आहे. 12 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दिल्ली ते मुंबई 12 तासांत पोहोचेल. दिल्ली ते जयपूर हे अंतर 2 तासांचे होईल, अशीही माहिती गडकरी यांनी दिली.
Join Our WhatsApp Community