खासगी रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णालयातील मेडिकल स्टोअर्समधूनच औषधे विकत घेणे बंधनकारक केले जात असताना अखेरिस अन्न व औषध प्रशासनाने परिपत्रकाच्या माध्यमातून आता कडक भूमिका घेतली आहे. रुग्णालयातील मेडिकल स्टोअर्समधून औषधे विकत घेणे बंधनकारक नाही, अशा आशयाचे फलक मेडिकल स्टोअर्सच्या मालकांना दर्शनी भागांत लावण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिले आहे. हे फलक तातडीने लावले जात आहेत का , ही तपासणी करण्याचे आदेशही आयुक्तांनी अधिका-यांना दिले आहेत.
खासगी रुग्णालयाच्या आवारात असलेल्या मेडिकल स्टोअर्समधून रुग्णांना औषधे विकत घेणे बंधनकारक नाही. याबाबतचे अन्न व औषध प्रशासनाने अनेकदा परिपत्रकाच्या माध्यमातून स्पष्टता दिली आहे. तरीही रुग्णांना खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स संबंधित मेडिकल स्टोअर्समधूनच औषधे विकत घेण्याची जबदस्ती करत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले. यासंबंधीच्या तक्रारीही अन्न व औषध प्रशासनाकडे रुग्णांनी केल्या. तक्रारींची दखल अन्न व औषध प्रशासनाने घेतली. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० नुसार रुग्णांना अशी सक्ती करता येत नाही, असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सांगितले. रुग्णालयातील औषधी दुकानातून औषधे खरेदी करण्याची सक्ती नाही. रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून औषधांची खरेदी करु शकतात अशा आशयाचा फलक दर्शनी भागांत लावा, अशी सूचनाही काळे यांनी केली आहे.
( हेही वाचा: समृद्धी महामार्गावरील ब्रिजने अडवली ट्रकची वाट… )
Join Our WhatsApp Community