पुण्यात गणेशोत्सवादरम्यान कलम 144 अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आल्याची माहिती गुरुवारी सकाळपासून देण्यात येत होती. परंतु असे कुठल्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले नसल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पुणे पोलिस सहआयुक्त रविंद्र शिसवे यांनी केले आहे.
अफवांवर विश्वास ठेऊ नका
गणेशोत्सवादरम्यान 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर पर्यंत पुण्यात ज्वालाग्राही पदार्थांशी संबंधित काही नियम कलम 144 अंतर्गत लागू करण्यात आले आहेत. परंतु काही नागरिकांकडून पुण्यात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आल्याचा अर्थ काढण्यात आला. त्यामुळे अशा कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी नियम पाळावेत आणि उत्सवादरम्यान गर्दी करू नयेत, असे आवाहन पुणे पोलिस सह आयुक्त रविंद्र शिसवे यांनी पुणेकरांना केले आहे.
(हेही वाचाः गणेशोत्सवात मुंबईत लागू होणार जमावबंदी… मुंबई पोलिसांचे आदेश नक्की वाचा)
मुंबईत जमावबंदी
गणेशात्सवादरम्यान राज्यात कोविडच्या तिस-या लाटेचा धोका वर्तवण्यात येत आहे. यामुळे मुंबई पोलिसांनी कडक पावले उचलली असून, मुंबईत कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले आहेत. 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2021 दरम्यान 144 अंतर्गत मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणा-या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही मुंबई पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community