मुंबईत डेल्टा प्लस आहे का? जाणून घ्या…

कोविड बाधा झालेल्या एकूण १८८ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. ज्यामध्ये १२८ रुग्ण हे ‘डेल्टा’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते.

85

मुंबईत करण्यात आलेल्या ३७४ नमुन्यांच्या चाचण्यांपैकी ३०४ नमुने हे ‘डेल्टा’ (Delta) उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर इतर नमुन्यांमध्ये ‘नाईन्टीन-ए’ (19A) उप प्रकारातील २ आणि ‘ट्वेन्टी-ए’ (20A) उप प्रकारातील ४ नमुने आणि उर्वरित ६६ नमुने हे सर्वसाधारण कोविड विषाणूचे आहेत. विशेष म्हणजे पहिल्या व दुस-या अशा दोन्ही टप्प्यातील नमुन्यांमध्ये अतिवेगाने लागण होणा-या ‘डेल्टा प्लस’ या उपप्रकारातील एकही नमुना आढळून आलेला नाही, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे)  सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

कस्तुरबामध्ये कोविडच्या उप प्रकारांची ओळख पटविणे शक्य 

कोविड – १९ या विषाणूच्या जनुकीय सुत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग) करणारी वैद्यकीय यंत्रणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात यापूर्वीच कार्यान्वित झाली आहे. या अत्याधुनिक यंत्राच्या आधारे कोविड विषाणूंमधील विविध उप प्रकारांची ओळख पटविणे शक्य आहे. यामुळे कोविड उपचार पद्धती व प्रतिबंधात्मक उपाययोजना इत्यादींबाबत अधिक प्रभावी व्यवस्थापन करण्यास मदत होते. महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत असलेल्या कार्यवाही अंतर्गत या यंत्राद्वारे उपलब्ध होणा-या आकडेवारीचे विश्लेषण नियमितपणे करण्यात येत आहे. यानुसार सदर चाचण्यांचे विश्लेषण आधारित दुस-या टप्प्यातील निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.

कोरोना नियमांचे पालन गांभीर्याने करण्याचे आवाहन   

दरम्यान, ‘डेल्टा’ या उप प्रकारातील कोविड विषाणूची वेगाने होणारी लागण लक्षात घेता, ‘कोविड – १९’ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘मास्क’चा सुयोग्य वापर, २ किंवा अधिक व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे व सुयोग्य प्रकारे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. तरी, सर्व मुंबईकर नागरिकांनी या उपाययोजनांची कटाक्षाने व कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे विनम्र आवाहन काकाणी यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.

(हेही वाचा : हुश्श्य! कोविड चाचण्या वाढल्या, तरी रुग्ण संख्या घटलेलीच!)

पहिल्या चाचणीतील आकडेवारीचे विश्लेषण

या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये पहिल्या टप्प्यातील (फर्स्ट बॅच) चाचण्यांचे निष्कर्ष गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कोविड बाधा झालेल्या एकूण १८८ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. ज्यामध्ये १२८ रुग्ण हे ‘डेल्टा’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. तर इतर रुग्ण हे सर्वसाधारण कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले होते.

केवळ ५८ टक्के रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज

या पहिल्या टप्प्यातील आकडेवारीबाबत विश्लेषणात्मक निष्कर्ष नुकतेच हाती आले असून यानुसार डेल्टा बाधीत १२८ नमुन्यांपैकी ९३ नमुने हे मुंबईतील रुग्णांचे होते. या ९३ रुग्णांपैकी ४५ नमुने हे पुरुष रुग्णांचे, तर ४८ नमुने हे स्त्री रुग्णांचे होते. तसेच या ९३ व्यक्तींपैकी ५४ व्यक्तींना म्हणजेच सुमारे ५८ टक्के व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली. तर उर्वरित ४२ टक्के म्हणजेच ४० व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे आढळून न आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. तसेच या ९३ रुग्णांपैकी ४७ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली होती. ज्यापैकी २० व्यक्तींनी पहिला डोस, तर २७ व्यक्तींनी दोन्ही डोस घेतले होते. उर्वरित ४६ रुग्णांनी लस घेतली नव्हती. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या केवळ ४ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज भासली.

निकटच्या संपर्कातील बधितांचे प्रमाण कमी

मुंबईतील ९३ रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील १ हजार १९४ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. ज्यापैकी केवळ ८० व्यक्तींना कोविड बाधा झाल्याचे आढळून आले. तर १ हजार ११४ व्यक्तींना कोविड बाधा झालेली नसल्याचे आढळून आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.