H3N2 इनफ्लूएंझाच्या रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. सर्दी, खोकला आणि तापामुळे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, ठाणे, सांगणी आणि कोल्हापूर याठिकाणी H3N2 इनफ्लूएंझाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झाले असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.
( हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरनंतर आता पुण्यात ईडीची छापेमारी; बिल्डर्स आणि काॅन्ट्रॅक्टरर्सची चौकशी)
महाराष्ट्रात H3N2 झपाट्याने पसरत असून सध्या या आजारावर औषधं उपलब्ध नाहीत मात्र, नागरिकांनी घाबरू नये. विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, मास्क वापरा आणि सामाजिक अंतर राखा असे आवाहन राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गुरूवारी आरोग्य विभागाची बैठक झाली.
H3N2 या व्हायरल विषाणूमुळे महाराष्ट्रात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. H3N2 इनफ्लूएंझाचा पहिला बळी कर्नाटकमध्ये झाला होता. त्यानंतर दुसरा मृत्यू हरियाणामध्ये झाला. आता देशातील H3N2 इनफ्लूएंझा संसर्गाच्या मृत्यूची संख्या १० झाली आहे.