राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात वाढ करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. यासंदर्भात पाटील यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढवल्यास राज्यातील तरुण वर्गात निराशा निर्माण होऊन त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होईल आणि मोठ्या प्रमाणात आंदोलने होतील, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्ष करावे, अशी सरकारी अधिकारी, कर्मचारी संघटनांची मागणी आहे. या मागणीबाबत सरकार सकारात्मक असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यास विरोध केला आहे. (Jayant Patil)
राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवून ६० वर्ष केल्याने आगामी दोन वर्षात शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण नगण्य होईल. पर्यायाने सरकारी सेवेतील पदे रिक्त होणार नाहीत आणि नवीन बेरोजगार, होतकरु उमेदवारांची शासन सेवेत प्रवेश करण्याची संधी हिरावली जाऊन बेरोजगारीचे प्रमाण वाढेल. तसेच, ज्यांच्यासाठी शासन सेवेत प्रवेशाची अंतिम दोन संधी असतील असे उमेदवार संधी उपलब्ध न झाल्याने वयोमर्यादेमुळे अपात्र होतील. या सर्वच गोष्टींमुळे राज्यातील तरुण वर्गात असंतोष निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे. (Jayant Patil)
जयंत पाटील यांनी केली ही भीती व्यक्त
सद्यस्थितीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये मोठ्या प्रमाणात कुंठीतता असल्याने राज्य सरकारला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा लागत आहे. त्यामध्ये सेवानिवृत्तीचे वय अजून वाढविल्यास कुंठीततेमध्ये वाढ होऊन शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार नाही. यामुळे अधिकारी, कर्मचारी नाउमेद होऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण होईल. तसेच, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढून सरकारवर आर्थिक बोजा वाढेल, अशी भीती जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रात व्यक्त केली आहे. (Jayant Patil)
सद्यस्थितीमध्ये निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियतकालिक वेतनवाढ मिळाल्याने त्यांचे मासिक वेतन जास्त आहे. त्यांच्याऐवजी नव्याने नियुक्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांना शासनास कमी वेतन द्यावे लागेल. त्यामुळे शासनाच्या वेतनावर होणाऱ्या खर्चावर बचत होईल. तसेच दोन वर्षानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनात अजून वाढ होऊन निवृत्तीवेतन आणि इतर अनुषांगिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल, याकडे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. काही मूठभर व्यक्तींच्या फायद्यासाठी सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष न करता त्याऐवजी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक स्वेच्छानिवृत्ती योजना उपलब्ध करुन देण्याची सूचना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. (Jayant Patil)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community