राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल प्रवास बंद करण्यात आला आहे. तरी देखील काहीजण बनावट ओळखपत्र बनवत लोकलमधून प्रवास करत होते. मात्र, या बनावट ओळखपत्र धारकांवर कारवाई करायला रेल्वेने सुरुवात केल्यानंतर आता लोकल प्रवाशांची संख्या घटल्याचे पहायला मिळत आहे. बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणा-या प्रवाशांना शोधण्यासाठी लोकलमध्ये फिरते पथक, रेल्वे प्रवेशद्वारावर रेल्वे पोलिस आणि स्थानकांत तिकीट तपासनिसाची संख्या वाढल्याने जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात प्रवाशांची संख्या कमी झाली आहे.
अशी कमी झाली संख्या
मध्य रेल्वेद्वारे जून महिन्यात एकूण 19 लाख प्रवासी प्रवास करत होते. मात्र, जुलै महिन्यात ही संख्या 11 लाखांवर आली आहे. तर, पश्चिम रेल्वेवर जून महिन्यात प्रवाशांची संख्या 13 लाखांवरुन जुलै महिन्यात 6 लाखांवर आली आहे. जून, जुलै महिन्यात चाकरमानी शेतीसाठी बाहेरगावी जातात. अनेक परप्रांतीय देखील त्यांच्या मूळ गावी जाऊन शेतीची कामे हाती घेतात. तसेच राज्यातील बांधकामाची, इतर व्यवसायाची कामे आटपून अनेक कामगार बाहेरील राज्यात जाऊन कामे करतात. त्यामुळे उपनगरीय लोकलमधील प्रवाशांची संख्या कमी आहे.
(हेही वाचाः लोकलसाठी भाजप घेणार रेल्वे इंजिनाची साथ?)
इतकी झाली दंडवसुली
पश्चिम रेल्वेने एप्रिल ते जून महिन्यात बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणाऱ्या 740 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 3 लाखांची दंड वसुली करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने एप्रिल ते जून महिन्यात एकूण 3 हजार 208 बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणाऱ्यांना पकडण्यात आले आहे. यांच्याकडून 16 लाखांची दंडवसुली झाली आहे.
(हेही वाचाः ‘नाहीतर माझा पक्ष आंदोलन सुरू करेल…’ राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र)
मध्य रेल्वेवरील घटणारी प्रवासी संख्या
7 जून 19 लाख
14 जून 18 लाख
21 जून 18 लाख
28 जून 15 लाख
5 जुलै 16 लाख
12 जुलै 13 लाख
19 जुलै 11 लाख