पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर पावसाळ्यात नो टेन्शन: महापालिका करणार डागडुजी

140

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीएकडून मागील डिसेंबर महिन्यांमध्ये महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर आता या मार्गाच्या डागडुजीसाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी आता निविदा मागवण्यात आली असून येत्या पावसाळ्यापूर्वीच या दोन्ही द्रुतगती मार्गाची डागडुजी केली जाणार आहे. यामध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गासाठी १४२ कोटी रुपये आणि पूर्व उपनगरासाठी ९३ कोटी रुपयांच्या अंदाजित रकमेच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत.

एमएमआरडीएच्या ताब्यात आलेल्या पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे खड्डे आणि मुंबई मेट्रो रेल्वेची कामे आदींमुळे वाहतुकीला होणाऱ्या अडचणींचा त्रास लक्षात घेता तत्कालिन ठाकरे सरकारने हे दोन्ही महामार्ग महापालिकेला हस्तांतरीत करून त्यांच्या माध्यमातून देखभाल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्याने शिंदे-फडणवीस सरकारने या दोन्ही महामार्गाची देखभाल महापालिकेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेत एमएमआरडीएला हे दोन्ही रस्ते हस्तांतरीत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नोव्हेंबर-डिसेंबर २०२२मध्ये दोन्ही रस्ते महापालिकेच्या ताब्यात आले.

हे रस्ते ताब्यात आल्यानंतर महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाने पुलांची जबाबदारी स्वत:कडे राखत त्यावरील जाहिरातींचेही अधिकार स्वत:कडे ठेवले आहे. त्यामुळे पूलांचा भाग वगळता दोन्ही द्रुतगती महामार्गाची जबाबदारी आता महापालिकेकडे असून या मार्गावरील जाहिरातींचे अधिकारी महापालिकेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे जर एमएमआरडीएला वर्षभराचे शुल्क भरले असेल तर नोव्हेंबर २०२२ पासूनचे शुल्क महापालिका एमएमआरडीएकडून वसूल करणार आहे. याबाबतचा पत्रव्यवहार सुरु असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

(हेही वाचा #Exclusive उद्धव गटाच्या आमदारांना तूर्त जीवदान; शिवसेना ‘व्हीप’ बजावणार नाही!)

या जाहिरातींतून मिळणाऱ्या महसुलातून या दोन्ही रस्त्यांची डागडुजी करत देखभाल केली जाणार आहे. त्यामुळे दोन्ही रस्त्यांच्या डागडुजीकरता अंदाजित १३५ कोटी रुपयांच्या निविदा निमंत्रित करण्यात आल्या आहेत. या निविदा अंतिम करून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आल्यानंतर पावसाळ्यापूर्वी रस्त्याचा जो भाग खराब झाला आहे, त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे,असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या पावसाळ्यात या मार्गावरील पूल वगळता रस्त्यांवरील खड्डयांची समस्या कमी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पूर्व द्रुतगती महामार्ग

  • २३ .५५ किलो मीटर लांबी
  • रस्ते निविदा अंदाजित किंमत : ९३ कोटी रुपये

पश्चिम द्रुतगती महामार्ग

  • २३.५५ किलो मीटर लांबी
  • रस्ते निविदा अंदाजित किंमत: १४२ कोटी रुपये
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.