ईद-ए-मिलादच्या दिवशी मुंबईतील ‘या’ भागांत ध्वनी प्रदूषणाचा जोर वाढला

139

ईद-ए-मिलाद सणानिमित्ताने भायखळा येथील मोहम्मद अली मार्गावर सर्वात जास्त ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन झाल्याची माहिती आवाज फाऊंडेशन या ध्वनी प्रदूषणाविरोधी लढणा-या पर्यावरणप्रेमी संस्थेने दिली. कोरोना काळानंतर आवाजाच्या मर्यादेचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचे निरीक्षणही आवाज फाऊंडेशनने नोंदवले.

आवाजाची मर्यादा थेट ११६.३ डेसिबलपर्यंत पोहोचली

सणोत्सवादरम्यान होणा-या ध्वनी प्रदूषणाविषयी जनजागृती व्हावी म्हणून आवाज फाऊंडेशनच्यावतीने वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन ध्वनी प्रदूषणाचे मोजमाप केले जाते. ईद-ए-मिलादच्या उत्सवादरम्यान जेजे रुग्णालयाजवळील मोहम्मद अली मार्गावर वेगवेगळ्या ट्रक्सवर डीजे लावला गेला. ट्रक्सवर वेगवेगळ्या पद्धतीची गाणी आणि संगीत लाऊडस्पीकरच्या माध्यमातून वाजवले जात होते. डीजे वाजवायला पोलिसांनी बंदी घातलेली असतानाही या नियमाचे सर्रास उल्लंघन झाल्याचे आवाज फाऊंडेशनच्या सर्व्हेक्षणात पाहण्यात आले. परिणामी, आवाजाची मर्यादा थेट ११६.३ डेसिबलपर्यंत पोहोचली. त्यामुळे या प्रकारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आवाज फाऊंडेशनच्या संस्थापिका सुमैरा अब्दुलली यांनी केली. या प्रकरणी ध्वनी प्रदूषणाच्या उल्लंघनाविषयी आवाज फाऊंडेशनच्या संस्थापिका सुमैरा अब्दुलली यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र लिहिले आहे. भायखळ्यात लाऊडस्पीकरवर लावलेल्या डीजेमुळे अजून एका ठिकाणी ११२.५ डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा पोहोचली. आवाजाची मर्यादा पाळूनच सणोत्सव साजरे करायला हवेत, अशी मागणी आवाज फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आली आहे.

(हेही वाचा दुकानांच्या पाट्या सात दिवसांमध्ये बदला : महापालिकेची दुकानदारांना अंतिम संधी अन्यथा होणार सोमवारपासून थेट कारवाई)

गेल्या दोन वर्षांतील ईद ए मिलादच्यावेळी ध्वनी प्रदूषण (डेसिबलमध्ये)

ऑक्टोबर २०२० – नागपाडा परिसर – ६६.१

ऑक्टोबर २०२१  – मोहम्मद अली रोड – १०९.७

ऑक्टोबर २०२२ – मोहम्मद अली रोड, भायखळा – ११६.३

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.