मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघांपैंकी उत्तर मध्य मुंबई मतदार संघ वगळता उर्वरीत सर्व मतदार संघांमध्ये कुठे महायुतीचा तर कुठे महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. परंतु उत्तर मध्य मुंबईत मात्र उमेदवार घोषित करण्यावरून भाजपा आणि काँग्रेस पक्षाकडून पहिले आप, पहिले आप असेच चालू असल्याचे दिसून येत आहे. या लोकसभा मतदार संघामध्ये ना भाजपाचा उमेदवार जाहीर केला ना काँग्रेसने. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे १५ दिवस शिल्लक असून काही उमेदवारांनी तर प्रचारालाही सुरुवात केली आहे. तर मग उत्तर मध्य मुंबईत उमेदवार जाहीर केव्हा होणार आणि प्रचाराला सुरुवात केव्हा होणार असा प्रश्न आता मतदारांनाच पडू लागला आहे. (North Central Mumbai Lok Sabha Constituency)
उमेदवार शेवटच्या दिवसापर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघामधून भाजपाच्या पुनम महाजन या सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या असून यावेळी भाजपाकडून त्यांचा पत्ता कापला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाजनांचा पत्ता कापल्यास त्यांच्या जागी भाजपा कुणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, या लोकसभा मतदार संघामधून पुनम महाजन यांनाच उमेदवारी देण्याचा प्रयत्न होणार की त्यांच्या जागी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना लागलेली आहे. पुनम महाजन यांना उमेदवारी दिल्यास काय परिणाम होईल आणि शेलार यांना दिल्यास काय फरक पडेल याची चाचपणी भाजपावतीने करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणचा उमेदवार शेवटच्या दिवसापर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता भाजपाकडून वर्तवली जात आहे. (North Central Mumbai Lok Sabha Constituency)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : माढ्याची सुभेदारी अखेर मोहिते पाटलांकडे?)
काँग्रेस पक्षाला सोडण्यात आल्यानंतरही…
मात्र, दुसरीकडे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ हा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला सोडला गेला आहे. त्यामुळे या मतदार संघात काँग्रेसच्यावतीने माजी मंत्री नसीम खान, सुरेश शेट्टी यांची नावे चर्चेत आहेत. शिवाय स्वरा भास्कर यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र, हा मतदार संघ काँग्रेस पक्षाला सोडण्यात आल्यानंतरही या मतदार संघातून त्यांना उमेदवाराची घोषणा करता येत नाही. (North Central Mumbai Lok Sabha Constituency)
उमेदवार घोषित करण्यास अवधी घालवला
या मतदार संघात भाजपाचा खासदार असल्याने या पक्षाच्यावतीने निवडणूक चिन्ह हे घराघरांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, उमेदवार कोण हेच फक्त ठरायचे आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे हाताचा पंजा हे चिन्ह असले तरी उमेदवाराला हा मतदार संघ पिंजून काढण्यास अवधी असतानाही उमेदवार घोषित करण्यास अवधी घालवला जात असल्याने याचा फटका उमेदवाराला आणि पर्यायाने महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (North Central Mumbai Lok Sabha Constituency)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community