उत्तर मुंबईतील मालाड ते दहिसर या भागांमध्ये मोठ्याप्रमाणात लोकसंख्या वाढू लागली असून या वाढत्या लोकसंख्येबरोबरच येथील मलवाहिन्यांची क्षमता वाढवण्यात आलेली नाही. परिणामी क्षमतेपेक्षा जास्त मलजल वाहू लागल्याने अनेक ठिकाणी अनेक मलजल वाहिन्यांमधून सांडपाणी बाहेर वाहू लागते. त्यामुळे या भागातील मलजलाचा निचरा सुरळीत होण्यासाठी आता भूमिगत मल जलवाहिनी बोगदा स्वरुपात बनवण्यात येत असल्याने पुढील चार ते पाच वर्षांमध्ये उत्तर मुंबईकरांची तुंबणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येतून सुटका होणार आहे. विशेष म्हणजे या कंत्राट कामांसाठी जे कुमार यां कंपनीची निवड करण्यता आली असून या प्रकल्पाच्या माध्यमातून जे.कुमार या कंपनीने पुन्हा एकदा महापालिकेत प्रवेश केला आहे.
( हेही वाचा : सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळविणाऱ्या एनसीसी कॅडेट्सना राज्यपालांची कौतुकाची थाप)
भूमिगत मलजल बोगदा
डॉन बॉस्को ते नवीन मालाड उदंचन (पंपिंग स्टेशन) केंद्राच्या ठिकाणी प्राधान्य मलनि:सारण बोगदा क्रमांक १चे का बांधकाम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत आहे. दहिसर, बोरीवली, गोराई, चारकोपर, मालाड व कांदिवली या परिसरातील सध्या असलेले मलजलाचे जाळे हे सद्यस्थितीत मलजल वाहून नेण्यास सक्षम नाही. परिणामी मलजल बऱ्याच वेळा रस्त्यांवर व आजुबाजुच्या परिसरात पसरते. विशेषत: पावसाळ्यात हे मलजल पावसामुळे येणाऱ्या पुराच्या पाण्यात मिसळते व त्यामुळे आजुबाजुच्या परिसरात रोगराई मिसळते. त्यामुळे महापालिकेच्यावतीने भूमिगत मलजल बोगदा बनवण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
काळ्या यादीतील कंपनीची पुन्हा महापालिकेत एन्ट्री
दहिसर, बोरीवली ते मालाड या परिसराचा मलजल नवीन लिंक रोडवरील मलवाहिनीतील मलप्रवाह हा प्राधान्य मलजल बोगद्यात सोडला जाणार आहे. या बोगदा कामासाठी महापालिकेच्यावतीने जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट व मिशिगन इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली असून या संयुक्त भागीदारीतील कंपनीला ६७० कोटी रुपयांचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे रस्ते कंत्राट कामांमध्ये जे कुमार या कंपनीला महापालिकेने काळ्या यादीत टाकले होते. परंतु या काळ्या यादीतील शिक्षेचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर या कंपनीने पुन्हा दमदार सुरुवात केली आहे.
महापालिकेने जे.कुमार या कंपनीला काळ्या यादीत टाकले असले तरी या कालावधीत या कंपनीने मुंबई मेट्रोच्या धारावी, बीकेसी विद्यानगरी आणि सांताक्रुझ या ४ भूमिगत स्थानकांची कामे केली. या कामांच्या अनुभवाच्या आधारावर हे कंत्राट देण्यात आले.
Join Our WhatsApp Community