अवयवदानासाठी असाही घेतला पुढाकार

अवयवदानाच्या चळवळीची सुरुवात नव्या वर्षात संथगतीने सुरु असताना जानेवारी महिन्याच्या अखेरिस आग्री समाजाकडून अवयवदान झाले. आग्री समाजात अवयवदानाविषयी फारशी जागरुकता नसल्याने रमाकांत लोगडे या ५४ वर्षीय इसमाने अवयवदानाचा नवा पाया रचला. दुचाकीवरुन झालेल्या अपघातामुळे मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने बदलापूर येथील रमाकांत लोगडे यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. कुटुंबीयांनी डॉक्टरांशी तसेच नातेवाईकांशी चर्चा करुन दोन मूत्रपिंडांचे दान केले. या अवयवदानामुळे दोन रुग्णांना नवे जीवनदान मिळाल्याचे समाधान कुटुंबीयांनी व्यक्त केले.
रमाकांत लोगडे

नेमकी घटना काय?

२५ तारखेला घरापासून काही मिनिटांच्या अंतरावर रमाकांत लोगडे यांच्या दुचाकीला दुसरी दुचाकी आदळली. या अपघातात रमाकांत लोगडे डोक्यावर आपटले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. दुस-या दिवशी कुटुंबीयांनी त्यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. परंतु रमाकांत लोगडे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेरिस ३१ तारखेला डॉक्टरांनी रमाकांत लोगडे यांना मेंदू मृत जाहीर केले. या अवस्थेतील रुग्णाचा जीव वाचत नाही परंतु ठराविक काळच्याआत अवयवदान करता येते, अशी माहिती डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली. रुग्णाचे नातेवाईक अनिल मोकल यांनी रुग्णाच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. मोकल स्वतः अवयवदानासाठी नोंदणीकृत सदस्य आहेत. अवयवदानामुळे रुग्णाला कोणताही त्रास होत नाही, याविषयी मोकल यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. अखेरिस ३१ तारखेला कुटुंबीयांनी अवयवदासाठी संमती दिली. वयाच्या मर्यादेमुळे तसेच इतर आजारांमुळे इतर अवयव दानाकरिता वापरले गेले नाही. या अवयवदानामुळे आग्री समाजात आता अवयवदानाची संकल्पना परिचित होईल, अशी आशा मोकल यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here