रुग्णाची घरी जावून वैद्यकीय तपासणी, मग मिळणार गरजेनुसार रुग्णखाट!

गृहभेटींद्वारे करण्यात येणारी रुग्णांची वैद्यकीय तपासणीची कार्यवाही ही सकाळी ७.०० ते रात्री ११.०० या कालावधी दरम्यान करण्यात येईल.

145

मुंबईत अनेक रुग्ण हे घरीच उपचार घेत असून अशा रुग्णांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना वॉर रुमच्या माध्यमातून रुग्णलयात रुग्ण खाट उपलब्ध करून दिली जाते. परंतु वॉर रुमकडे मागणी करणाऱ्या रुग्णाची नेमकी प्रकृती कशा प्रकारची आहे. त्यांना खरोखरच आयसीयूची गरज आहे की ऑक्सिजनची अथवा घरीच त्यांच्यावर उपचार होवू शकतात, याची आता वैद्यकीय तपासणी रुग्णाच्या घरी जावून केली जाणार आहे. या वैद्यकीय तपासणीनंतरच रुग्णाला रुग्णखाटेचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबतचे निर्देशच महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.

मुंबईतील कोविडबाधित रुग्णांना करण्यात येत असलेल्या रुग्णखाटा वाटपाबाबत अधिक प्रभावी सुव्यवस्थापन राखण्याकरता महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी दरम्यान महापालिका आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे आयोजित या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्यासह वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल, महापालिकेच्या विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता, सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त व विविध खात्यांचे प्रमुख आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

येत्या रविवारपासून व्यवस्था कार्यान्वित!

या बैठकीत मुंबईतील लक्षणे असणा-या कोविडबाधित रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णखाटांचे वाटप हे वैद्यकीय तपासणीनंतरच करण्याचे निर्देश आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे ही वैद्यकीय तपासणी रुग्णाच्या घरी भेट देऊन अर्थात गृहभेटीद्वारे केली जाणार आहे. गृहभेटीद्वारे करण्यात येणा-या या वैद्यकीय तपासण्यांचे समन्वय हे विभागस्तरीय ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे करण्यात येणार आहे. गृहभेटींद्वारे करण्यात येणा-या वैद्यकीय तपासणींसाठी प्रत्येक विभागाच्या स्तरावर प्रत्येकी किमान १० तपासणी चमू व या प्रत्येक चमुसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था तात्काळ करवून घेण्याचे निर्देशही महानगरपालिका आयुक्तांनी दिले असून ही व्यवस्था येत्या रविवारपासून अंमलात येणार आहे. यानुसार वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णाची गरज लक्षात घेऊन त्याच्या गरजेनुरुप रुग्णशय्येचे वितरण करणे सुलभ होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

(हेही वाचा : आनंदाची बातमी! कोरोनावर औषध आले! )

तीन प्रकारच्या रुग्णखाटांची गरज

मुंबईतील कोविडबाधित रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णशय्यांच्या वाटपाचे समन्वय हे महापालिकेच्या २४ विभागांमध्ये कार्यरत असणा-या ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे सुयोग्यप्रकारे करण्यात येत आहे. यामध्ये सामान्य रुग्णशय्या, प्राणवायू पुरवठा सुविधा असणारी रुग्णशय्या (ऑक्सिजन बेड) आणि अतिदक्षता कक्षातील रुग्णशय्या अशा ३ प्रकारच्या रुग्णशय्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

रुग्णाला गरजेप्रमाणेच रुग्णखाटांचे वाटप

गेल्या काही दिवसात कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे रुग्णांना रुग्णखाटा मिळण्यात अडचणी येत असल्याच्या सूचना प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णखाटा वितरणाच्या पद्धतीमध्ये सकारात्मक सुधारणा करण्यात येत आहे. यानुसार लक्षणे वा तीव्र लक्षणे असणा-या कोविडबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्याची मागणी ‘वॉर्ड वॉर रुम’कडे करण्यात आल्यानंतर अशा रुग्णांची महापालिकेच्या वैद्यकीय चमुद्वारे तपासणी केली जाणार आहे. गृहभेटींद्वारे करण्यात येणा-या या वैद्यकीय तपासणीनंतर सदर रुग्णास ज्या प्रकारच्या रुग्णखाटेची गरज असेल, त्या प्रकारच्या रुग्णशय्येचे वितरण करण्याचे समन्वयन विभागस्तरीय ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे करण्यात येईल.

२४ विभागांमध्ये प्रत्येकी १० टिम कार्यरत

कोविडबाधित रुग्णाच्या घरी जाऊन वैद्यकीय तपासणी करणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये प्रत्येकी किमान १० चमू कार्यतत्पर असतील. तर या चमुंना रुग्णांच्या घरी जाणे सुलभ व्हावे, यासाठी प्रत्येक चमुसाठी १ यानुसार प्रत्येक विभागात १० रुग्णवाहिका सुसज्ज असतील.

(हेही वाचा : मुंबईत मागील २० दिवसांमध्ये १ हजार २२८ आयसीयू बेड वाढले, तरीही…)

तातडीची वैद्यकीय तपासणी जम्बो कोविड सेंटरमध्ये

गृहभेटींद्वारे करण्यात येणारी रुग्णांची वैद्यकीय तपासणीची कार्यवाही ही सकाळी ७.०० ते रात्री ११.०० या कालावधी दरम्यान करण्यात येईल. तर रात्री ११.०० ते सकाळी ७.०० या कालावधीमध्ये एखाद्या रुग्णाची वैद्यकीय तपासणी तातडीने करणे गरजेचे असल्यास अशी तपासणी महापालिकेच्या जम्बो कोविड उपचार केंद्रांमध्ये केली जाईल. तथापि, याबाबत देखील आवश्यक ते सर्व समन्वयन हे ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारेच केले जाणार आहे. गृहभेटींद्वारे वैद्यकीय तपासणी करुन रुग्णशय्या वितरण करण्याची कार्यवाही येत्या रविवारपासून म्हणजेच २५ एप्रिल २०२१ पासून अंमलात आणण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या सुधारित पद्धतीमुळे लक्षणे असणा-या कोविड बाधित रुग्णाला त्याच्या वैद्यकीय गरजेनुसार रुग्णशय्येचे वितरण करण्यात येणार आहे. ज्यामुळे रुग्णशय्या वितरणाचे व्यवस्थापन अधिक सुयोग्यप्रकारे करणे शक्य होणार आहे.

तर रुग्णाला प्रतीक्षा यादीवर ठेवणार

अपवादात्मक संभाव्य परिस्थितीत एखाद्या रुग्णास वैद्यकीय चमुने ज्या प्रकारच्या रुग्णशय्येचे वितरण करण्याचे सुचविले आहे, त्या प्रकारची रुग्णशय्या उपलब्ध नसल्यास अशा रुग्णाला प्रतिक्षा सुचीवर ठेवण्यात येईल व काही तासांनी रुग्णशय्या उपलब्ध झाल्यानंतर रुग्णशय्येचे वितरण करण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.