कोविडबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयांमध्ये होत असलेली गर्दी यामुळे आता रुग्णखाटा अधिकाधिक रिकाम्या ठेवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयांत दाखल असलेल्या ज्या रुग्णांना दहा दिवसांनंतर ऑक्सिजन बेड किंवा आयसीयू बेडची गरज भासणार नाही, अशा रुग्णांना थेट हॉटेलमध्ये हलवण्यात येणार आहे. यासाठी हॉटेलमध्ये ६०० खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. रुग्णालयाच्या परिसरात ही हॉटेल असणार आहेत आणि कोणत्या हॉटेलमध्ये रुग्णाला पाठवायचे हा निर्णय सर्वस्वी रुग्णालयाकडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे आजवर हॉटेलमधून हॉस्पिटल असा प्रवास असला, तरी वाढत्या रुग्ण खाटांची गरज भासू लागल्याने हॉस्पिटल ते हॉटेल असा प्रवास सुरू होणार आहे.
खाटांची कमतरता भासत असल्याने निर्णय
मुंबईत दरदिवशी सुमारे ९ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. यापैकी बहुतांशी रुग्ण हे घरी राहूनच उपचार घेत असले, तरी अनेकांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल केले जाते. सध्या मोठ्या प्रमाणात खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल केले जात आहे. मात्र, तरीही खाजगी रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे वाढत्या रुग्ण खाटांची मागणी लक्षात घेता, आता खाजगी रुग्णालयांमधील काही प्रमाणात बरे झालेल्या रुग्णांना तात्पुरत्या स्वरुपात हॉटेलमध्ये हलवण्याचा विचार होत आहे. यासाठी महापालिकेने हॉटेलमधील सुमारे ६०० जागा राखीव ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
(हेही वाचाः बेडच्या कमतरतेमुळे सरकारची डोकेदुखी वाढली… अर्थमंत्र्यांसोबत मंत्र्यांची बैठक!)
असा आहे निर्णय
आज खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी अनेक रुग्णांना आठ ते दहा दिवसांनंतर ऑक्सिजन किंवा आयसीयूची गरज भासत नाही. त्यांची तब्येत बऱ्याच अंशी बरी झालेली असते. तसेच काही जणांचे अहवाल अजूनही पॉझिटिव्ह असल्याने त्यांना घरी सोडता येत नाही. अशाप्रकारच्या खाटा अडवून राहणाऱ्या रुग्णांना आता हॉटेलमध्ये हलवण्यात येणार आहे. कोणत्या हॉटेमध्ये रुग्णाला ठेवायचे ते रुग्णालयच ठरवणार आहे. जेणेकरुन बऱ्याच अंशी बऱ्या झालेल्या रुग्णांना हॉटेलमध्ये ठेऊन त्यांच्यावर पुढील उपचार आणि देखरेख ठेवता येणार आहे. या रुग्णांमुळे रिक्त झालेल्या खाटांवर अन्य चिंताजनक रुग्णाला दाखल करुन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल, असा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळत आहे.
हॉटेलची यादी खाजगी रुग्णालयाकडे
अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, खाजगी रुग्णालयांमधील वाढती खाटांची मागणी लक्षात घेता महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. यामध्ये जे रुग्ण बरे झाले आहेत पण, त्यांना रुग्णालयात ठेवणे आवश्यक आहे. तसेच काहींची प्रकृती सुधारली आहे, पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत, पण ज्यांना घरी जायचे नाही, अशा रुग्णांसाठी ही हॉटेलची व्यवस्थाा असेल. या हॉटेलचे दर हे खाजगी रुग्णालयांमध्ये ८० टक्के दराने जो काही दर लावला जातो, तोच असणाार आहे. यामध्ये हॉटेल त्यांना जेवण देईल. शिवाय डॉक्टर आणि औषधांचा खर्च आकारला जाईल. मात्र, कोणत्या हॉटेलमध्ये दाखल करायचे हे त्या रुग्णालयावर अवलंबून असेल. जे ६०० बेड निश्चित केले आहेत, त्या हॉटेलची यादी खाजगी रुग्णालयाला दिली जाईल आणि ते आवश्यकतेनुसार रुग्णांना हॉटेलमध्ये पाठवतील. यामुळे बरे झालेले रुग्ण हे खाटा अडवून ठेवतात, त्यांना अन्यत्र हलवल्यामुळे अनेक खाटा रिकाम्या होऊ शकतात. जिथे अन्य रुग्णांना दाखल करता येऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचाः का निर्माण झाली रेमडेसिवीरची टंचाई? जाणून घ्या…)
Join Our WhatsApp Community