अग्निशमन केंद्र आणि मिनी अग्निशमन केंद्रांमध्ये ‘हे’ दुवा ठरणार

केंद्र सरकारच्या नियमानुसार प्रतिसादाची वेळ साडेसहा मिनिटांची असायला हवी. त्यामुळे या फायर बाईक्समुळे ही वेळ कमी करण्यात मदत होईल.

200

मुंबईमध्ये सध्या आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अशी दुर्घटना घडल्यानंतर दाटीवाटीने वसलेल्या वस्त्यांमध्ये वाहतूक कोंडीमुळे घटनास्थळी पोहोचण्यास होणारा विलंब लक्षात घेता, अग्निशमन दलाने फायर बाईक्सची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत २४ फायर बाईक्स खरेदी करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मोठी अग्निशमन केंद्रे आणि छोट्या अग्निशमन केंद्रांतील अंतर या आता फायर बाईक्स कमी करणार असून, त्यामुळे आग विझवण्याचा वेळही कमी करण्यात अग्निशमन दलाला यश येणार आहे.

विरोधी पक्षनेत्यांचा सवाल

मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने २४ फायर बाईक्स खरेदी करण्याचा प्रस्ताव आला असता, विराधी पक्षनेते रवी राजा यांनी मुंबईत ३५ अग्निशमन केंद्र असताना २४ फायर बाईक्स कुठे ठेवणार आहात, असा सवाल केला. आपण अग्निशमन दलाला सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत असलो तरी जवानांवर आमचा विश्वास आहे, ते जीव धोक्यात घालून काम करतात. साठ माळ्यांच्या वर शिडी जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा नाईलाज असतो, असे राजा म्हणाले.

पडताळणीशिवाय दिली जातात प्रमाणपत्रे

अशा मोठ्या इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करुन तेथील अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणा सुस्थितीत आहे का, याची प्रत्यक्ष पडताळणी न करताच प्रमाणपत्रे दिली जात असल्याने असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे दुबईच्या धर्तीवर प्रत्येक टोलेजंग इमारतींमधील रहिवाशांचे मॉक ड्रिल करण्यात यावे. फायर बाईक्स आधी दाखवण्यात याव्यात आणि त्यानंतरच हा प्रस्ताव मंजूर करावा, अशी सूचना रवी राजा यांनी केली.

वाहनांबाबत माहिती द्या

अग्निशमन दलाने जी सामग्री खरेदी केली, जो रोबोट खरेदी केला, त्याचा वापर कुठे केला जातो? ती वाहने कुठे असतात याची माहिती द्यावी, अशी मागणी भाजपाचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी रोबोटला आम्हालाच धक्का मारुन पुढे न्यावे लागले, असे सांगत कमांड सेंटर सुसज्ज नसल्याचे सांगितले. तर विनोद मिश्रा यांनी अशाप्रकारे टोलेजंग इमारतींमध्ये आग लागण्यास कारणीभूत असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, म्हणजे या भीतीने तरी प्रत्येक जण इमारतीची काळजी घेईल, असे सांगितले. तर मकरंद नार्वेकर यांनी परदेशात फायर बाईक्सचा आणि वाहनांचा वापर कसा होतो याचे दाखले देत, आगीची वर्दी मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडी नियंत्रणात आणणेही तेवढेच महत्वाचे असल्याचे सांगितले.

अग्निशमन दलांच्या जवानांचेही मॉक ड्रिल व्हावे

मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन कक्षाप्रमाणे अग्निशमन दलाचेही सुसज्ज आपत्कालिन कक्ष असावेत, असे सांगत सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी मुंबई पोलिसांप्रमाणे अग्निशमन दलांच्या जवानांचेही मॉक ड्रिल व्हावे, अशी सूचना केली आहे. तसेच प्रमाणपत्रांची पूर्तता करणारे अधिकारी प्रत्येक विभाग कार्यालयात असावे, यासाठी कर्मचारी नेमण्यात यावेत, अशीही मागणी त्यांनी केली.

बाईक्सचे प्रात्यक्षिक दाखवा

मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांवर व अधिकाऱ्यांवर कोणीही टीका करत नाही, तर यंत्र किती आहेत ती दाखवा, अशी सदस्यांची सूचना आहे. अग्निशमन दलाच्या जवानांच्या कामगिरीचे कायमच अभिनंदन केले जाते, पण या बाईक्स कशा आहेत, कशाप्रकारे त्याचा वापर केला जाणार आहे, याची माहिती सदस्यांना जाणून घ्यायची आहे. त्यामुळे याचे प्रात्यक्षिक सदस्यांना दाखवले जावे, अशी सूचना त्यांनी केली.

जीवितहानीचे प्रमाण कमी करण्यात अग्निशमन दलाला यश

यावर अश्विनी भिडे यांनी, यापूर्वी खरेदी करण्यात येणाऱ्या बाईक्सची नोंदणी ही केवळ बाईक्स अशीच होती. परंतु आता या बाईक्सची नोंदणी फायर बाईक्स अशी होणार आहे, असे सांगितले. मुंबईत ज्या काही आपत्कालिन घटना घडतात, त्यातील २० ते २५ टक्के घटना या आगीच्या असतात. परंतु स्थायी समितीने प्रस्तावांना मान्यता दिल्यामुळे तांत्रिक उपकरणे खरेदी करुन, जवानांचे कौशल्य वाढवण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत आगीमुळे जीवितहानीचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी म्हटले.

वेळ गाठणे सहज शक्य होईल

सध्या जो काही आगीच्या ठिकाणी पोहोचून बचाव कार्य राबवण्याचा प्रतिसाद वेळ आहे, तो शहरात २० मिनिटे आणि उपनगरांत २५ ते ३० मिनिटे इतका आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार प्रतिसादाची वेळ साडेसहा मिनिटांची असायला हवी. त्यामुळे या फायर बाईक्समुळे ही वेळ कमी करण्यात मदत होईलच, शिवाय मोठी अग्निशमन केंद्रे आणि मिनी अग्निशमन केंद्रे यांमध्ये या बाईक्स दुवा ठरणार असल्याचा विश्वास अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.