मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पदभार संभाळल्यानंतर आपली एक वेगळी छाप पाडायला सुरुवात केली आहे. आधी मुंबईकरांना ध्वनी प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी पावले उचलली. तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या संपर्कात राहणे, मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी संडे स्ट्रीटचा उपक्रम राबवणे अशा अनेक उपक्रमांनंतर आता सहआयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिका-यांनाही रात्रपाळी करावी लागणार असल्याचा निर्णय संजय पांडे यांनी घेतला आहे. पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच हा निर्णय घेण्यात आला आहे.
खुद्द आयुक्तही करणार रात्रपाळी
सह आयुक्त १५ दिवसांतून एकदा, वरिष्ठ पोलीस आयुक्त १० दिवसांतून एकदा तर डीसीपी आणि एसीपी सात दिवसांतून किमान एकदा रात्रपाळी करतील असे आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिले आहेत. 24 तासांत मुंबईत काही ना काही घडत असते. सध्याच्या घडीला मुंबईच्या विविध ठिकाणी ठाण्यातील पोलीस अधिकारी, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त हे रात्र पाळीवर शहरात गस्त घालण्यासोबतच विविध ठिकाणी पोलीस कर्मचा-यांच्या कामाचे पर्यवेक्षण करतात. सह आयुक्त 15 दिवसांतून एकदा, वरिष्ठ पोलीस अधिकारी 10 दिवसांतून एकदा तर डीसीपी आणि एसीपी 7 दिवसांतून किमान एकदा रात्रपाळी करणार आहेत. तसेच, खुद्द आयुक्त संजय पांडेही महिन्यातून एकदा रात्रपाळी करणार असल्याचे समजत आहे.
( हेही वाचा :पाण्यासाठी राष्ट्रवादी गेली भाजप खासदाराच्या दारी )
संजय पांडेंविषयी थोडक्यात
स्वच्छ प्रतिमा आणि भ्रष्टाचारी व गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेल्या संजय पांडे 1986 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. 1992-93 मध्ये मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीच्या वेळी ते पोलीस उपायुक्त होते. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार हाती आल्यानंतर संजय पांडे यांनी लोकोपयोगी निर्णयांमधून स्वतःची वेगळी छाप पाडायला सुरुवात केली आहे.