एनआयएमधून आलेल्या अधिकाऱ्याकडे सीआययूची धुरा! 

अनेक वर्षांपासून गुन्हे शाखेत जागा अडवून बसणाऱ्यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

97
मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने केलेली अटक, तसेच गुन्हे शाखेच्या काही अधिकाऱ्यांच्या या प्रकरणात झालेल्या चौकशी, या कारणांमुळे गुन्हे शाखेची बदनामी झाली आहे. त्यामुळे नवनियुक्त मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी संपूर्ण गुन्हे शाखेचा कायापालट केला आहे. अनेक वर्षांपासून गुन्हे शाखेत जागा अडवून बसणाऱ्यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. सचिन वाझेंमुळे सर्वाधिक बदनाम झालेल्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाला (सीआययु) प्रभारी म्हणून राष्ट्रीय तपास यंत्रणेत काम केलेले पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच बरोबर २४ पोलीस निरीक्षकांच्या गुन्हे शाखेच्या विविध पथकात बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

तडकाफडकी केल्या बदल्या!

मुंबई पोलीस दलाची तसेच गुन्हे शाखेची झालेली बदनामी भरून काढण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांना बसवण्यात आले. नगराळे यांनी आयुक्तपदाचा भार स्वीकारताच गुन्हे शाखेची झाडाझडती सुरु केली. गेली कित्येक वर्ष गुन्हे शाखेत ठाण मांडून बसलेले प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोउनिरीक्षक अश्या एकूण ६५ जणांची विविध पोलीस ठाणे आणि इतर विभागात बदल्या करण्यात आल्या. या जागा रिक्त झाल्यानंतर गुन्हे शाखेत पूर्वी काम केलेले तसेच बाहेरून आलेले अधिकारी असे एकूण २४ जणांना गुन्हे शाखेत सामावून घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेत महत्वाचे मानले जाणारे युनिट खंडणी विरोधी पथक आणि गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययु) प्रभारी पदी गुन्हे शाखेतील अनुभवी अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

खंडणीविरोधी पथकी प्रमुखपदी योगेश चव्हाण! 

गुन्हे शाखा कक्ष ३ मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून काम पहाणारे योगेश चव्हाण यांना खंडणी विरोधी पथकाच्या प्रमुखपदी बसवण्यात आले आहे. योगेश चव्हाण हे १९९५ च्या बॅचचे अधिकारी आहे. चव्हाण यांनी मुंबई गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथकात मागील अनेक वर्ष काम केले आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी चव्हाण यांनी महत्वाची कामगिरी केली आहे, तसेच अनेक किचकट गुन्ह्यांची उकल करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. योगेश चव्हाण हे खंडणी विरोधी पथकाची जबाबबदारी योग्यरित्या पार पाडतील, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सीआययूच्या प्रमुखपदी मिलिंद काठे!  

सर्वात महत्वाची जबाबदारी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांच्यावर सोपवण्यात आली आहे, एका अधिकाऱ्यांमुळे  बदनाम झालेले गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययू) च्या प्रमुख पदी मिलिंद काठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील व्ही.पी.रोड पोलीस ठाणे, त्यानंतर राज्य दहशतवाद विरोधी पथक तेथून प्रतिनियुक्तीवर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए ), मुंबई गुन्हे शाखा आणि पोलीस महासंचालक मुख्यालय येथील दांडगा अनुभव पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांना असून सीआययू पदी नियुक्तीनंतर येथील बदनामीचा डाग पुसून स्वच्छ कारभार करून पुन्हा एकदा सीआययु हे युनिट नावारूपाला आणण्याचा मानस काठे यांचा आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.