गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाची साखळी मोडण्यासाठी राज्यात आता मिनी लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत शिक्षण विभागाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील ९वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता, त्यांना आता सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.
म्हणून घेतला निर्णय
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अशा वेळी परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र १०वी आणि १२वीच्या परीक्षा होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः खुशखबर! यंदाच्या वर्षी सगळे पास! )
दहावी- बारावीच्या परीक्षा होणार
दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार की नाही असा संभ्रम असताना, दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पध्दतीनेच होणार आहेत. फक्त या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करायचा की नाही, यावर येत्या एक ते दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community