आता रंगांवरुन समजणार मुंबई मेट्रोची गर्दी!

कोणत्या स्थानकावर किती गर्दी आहे, याची माहिती या सिग्नलद्वारे कळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा अंदाज बांधून प्रवास करणे शक्य होणार आहे.

लाल, पिवळा, हिरवा या रंगांची ओळख आपल्याला सिग्नलचे रंग म्हणून आहे. पण आता काही रंग मेट्रोमधील गर्दी सुद्धा दाखवणार आहेत. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर धावणा-या मेट्रो वनची अधिकृत वेबसाईट १ मे रोजी अद्ययावत करण्यात आली आहे. यानुसार प्रवाशांना आता लाल, भगव्या आणि हिरव्या रंगाद्वारे प्रत्येक स्थानकातील रहदारीची माहिती मिळणे सोपे झाले आहे. कोणत्या स्थानकावर किती गर्दी आहे, याची माहिती या सिग्नलद्वारे कळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा अंदाज बांधून प्रवास करणे शक्य होणार आहे.

अशी आहे रंगांची ओळख

कोरोना काळात सध्या मुंबईतील प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. लाखोंच्या संख्येने मेट्रोमधून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या काही हजारांवर आली आहे. कडक निर्बंधांत सध्या मेट्रो वनच्या दिवसभर 100 फेऱ्या होतात. तर, यामधून  सुमारे 35 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रत्येक स्थानकावर गर्दीचे प्रमाण कमी आहे. मुंबई मेट्रो वनच्या अधिकृत वेबसाईटवर, वर्सोवा ते घाटकोपर पर्यंतच्या स्थानकांची नावे देण्यात आली आहेत. त्याप्रमाणे स्थानकातील गर्दीचे प्रमाण दर्शवणारे रंग दाखवण्यात येत आहेत. स्थानकाचे नाव हिरव्या रंगाने दिसत असल्यास स्थानकात कमी गर्दी, भगवा असल्यास मध्यम गर्दी आणि लाल रंग दर्शवत असल्यास जास्त किंवा दाटीवाटीची गर्दी असे प्रमाण ठरवण्यात आले आहे. प्रवासी स्थानकातील गर्दीचा अंदाज घेऊन, प्रवास करू शकतात, अशी माहिती मेट्रो प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

(हेही वाचाः आता कोविन-ॲप नोंदणीनुसारच लसीकरण)

मेट्रो स्टेशनवरील गर्दी व त्यानुसार प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास ही वेबसाईट फायदेशीर ठरणार आहे. ग्राहक कोणत्याही डेबिट/क्रेडिट कार्डचा वापर करुन आपल्या स्मार्टकार्डचे रिचार्ज सुद्धा या वेबसाईटवर करू शकतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here