आजपासून गर्भवती मातांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात!

मुंबईतील ३५ लसीकरण केंद्रांवर गरोदर मातांचे लसीकरण सुरु करण्यात येत आहे,

81

केंद्र शासनाच्या आदेशान्वये १६ जानेवारी २०२१ पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची कार्यवाही ही टप्प्याटप्प्याने व नियमितपणे करण्यात येत असून १९ मे २०२१ पासून स्तनदा मातांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. तर आता ‘राष्‍ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्‍लागार गट’ व ‘कोविड – १९’ लसीकरणासाठी असलेला ‘राष्‍ट्रीय तज्ज्ञ गट’ यांच्‍या शिफारशीनुसार भारत सरकारने गरोदर महिलांना ‘कोविड – १९’ लसीकरणात समाविष्‍ट केले आहे. यानुसार गुरुवार, १५ जुलै २०२१ पासून मुंबईतील ३५ लसीकरण केंद्रांवर गरोदर मातांचे लसीकरण सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

गरोदर महिलांना संसर्गाची शक्यता अधिक 

‘कोविड – १९’ या आजाराचा तीव्र संसर्ग होण्याचे प्रमाण इतर महिलांच्या तुलनेने गरोदर महिलांमध्ये अधिक होण्याची शक्यता असते. तसेच ‘कोविड – १९’ बाधित गरोदर महिलांमध्ये गरोदर काळ पूर्ण होण्याआधी प्रसूति होण्याचे प्रमाण अधिक आहे. ‘कोविड – १९’ बाधित ९०% गरोदर महिलांना दवाखान्यात भरती होण्याची गरज भासत नाही. परंतु सुमारे १०% गरोदर महिलांमध्ये गरोदरपणी मधुमेह, लठ्ठपणा, अधिक काळापासून असलेले श्वसनाचे आजार, प्रतिकार शक्ती विषयक औषधोपचार, डायलेसिस, हृदयरोग यामुळे ‘कोविड – १९’ आजाराचा तीव्र संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते व अचानक तब्येत ढासळल्यास त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्याची आवश्यकताही भासू शकते. तथापि, ‘कोविड – १९’ बाधित ९५% मातांची नवजात बालके सुस्थितीत जन्मतात. तर उर्वरित ५% नवजात बालके प्रसूतीच्या अपेक्षित दिनांकापूर्वी जन्माला येऊ शकतात. अशा बालकांच्या बाबत त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासू शकते किंवा क्वचित प्रसंगी नवजात बालकाचा दुर्दैवाने मृत्यू ओढवू शकतो. या बाबींपासून गर्भवती महिलांचा आणि होणा-या बाळाचा बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करवून घेणे फायदेशीर ठरु शकते. या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने गर्भवती महिलांचे ‘कोविड – १९’ लसीकरण करण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत.

(हेही वाचा : दादरच्या कासारवाडी आणि प्रभादेवीतील सफाई कामगार वसाहतींचा पुनर्विकास रखडणार)

गरोदर महिला कशाप्रकारे लसीकरणाचा लाभ घेऊ शकतात?

  • संबंधीत लसीकरण केंद्रात गर्भवती महिला गर्भधारणेनंतरच्या पूर्ण कालावधींतर्गत सदर लसीचा लाभ घेऊ शकतात.
  • प्रत्येक गरोदर महिलेने या संदर्भात संपूर्ण माहिती घ्यावी व पूर्ण माहितीपश्चात स्वेच्छेने (informed choice) लसीकरण करवून घ्यावे.
  • ज्या महिलांना ‘कोविड – १९’ प्रादुर्भाव होऊन गेलेला असेल व ज्या महिलांना ‘मोनॉक्लोनल ऑंटीबोडीज’ किंवा ‘convalescent’ प्लाजमा हा उपचार घेतलेला असेल, अशा महिलांना १२ आठवड्यानंतर लसीकरण करून घेता येईल.
  • ‘कोविड – १९’ लसीकरणानंतर, काही लाभार्थ्यांमध्‍ये सौम्य स्वरुपाचा ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणं किंवा १ ते ३ दिवस अस्वस्थ वाटण्याची भावना दिसून येऊ शकते. तुरळक स्वरूपात १ ते ५ लाख लोकांमधील एखादया लाभार्थ्‍यास लसीकरणानंतर २० दिवसापर्यंत गंभीर लक्षणे आढळून येऊ शकतात.

या पहिल्‍या टप्‍प्‍यात मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख सर्वोपचार रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृहे व काही शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. या रुग्णालयांची यादी खालीलप्रमाणे-

  • ए विभाग – कामा रुग्णालय, फोर्ट
  • ई विभाग – बा.य.ल. नायर धर्मार्थ रूग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई सेन्ट्रल
  • ई – जगजीवनराम पश्चिम रेल्वे रूग्णालय, भायखळा
  • ई विभाग – जे. जे. रूग्णालय, भायखळा
  • ई विभाग – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्य रेल्वे रूग्णालय, भायखळा
  • एफ उत्तर विभाग – मुंबई पोर्ट ट्रस्ट, वडाळा
  • एफ उत्तर विभाग – लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, शीव
  • एफ दक्षिण विभाग – राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय आणि सेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालय, परळ
  • एफ दक्षिण विभाग – एम. जी. एम. रुग्णालय, परळ
  • एफ दक्षिण विभाग – नायगाव प्रसूतिगृह
  • जी उत्तर विभाग – माहीम सूतिकागृह, माहिम
  • जी दक्षिण विभाग – ई. एस. आय. एस. रुग्णालय, वरळी
  • एच पूर्व विभाग – विष्णूप्रसाद नंदराय देसाई मनपा सर्वसाधारण रूग्णालय, सांताक्रूझ (पूर्व)
  • एच पश्चिम विभाग – के. बी. भाभा रूग्णालय, वांद्रे (पश्चिम)
  • के पश्चिम विभाग – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कुपर रूग्णालय, जुहू – विलेपार्ले (पश्चिम)
  • के पूर्व विभाग – शिरोडकर प्रसूतिगृह, विलेपार्ले
  • एल विभाग – खान बहादूर भाभा मनपा रुग्णालय, कुर्ला भाभा, कुर्ला (पश्चिम)
  • एल विभाग – माँ साहेब मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह, चुनाभट्टी
  • एम पूर्व विभाग – देवनार प्रसूतिगृह
  • एम पश्चिम विभाग – पं. मदनमोहन मालविय शताब्दी रूग्णालय, गोवंडी (पूर्व)
  • एम पूर्व विभाग – बी. ए. आर. सी. रुग्णालय, चेंबूर
  • एम पूर्व विभाग – आर. सी. एफ. हॉस्पिटल
  • एन विभाग – मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसूतिगृह
  • एन विभाग – संत मुक्ताबाई मनपा सर्वसाधारण रुग्णालय, घाटकोपर (पश्चिम)
  • एन विभाग – सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्होरा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, राजावाडी घाटकोपर (पूर्व)
  • पी उत्तर विभाग – चौक्सी प्रसूतिगृह, मालाड
  • पी उत्तर विभाग – मनोहर वामन देसाई मनपा सर्वसाधारण रूग्णालय, मालाड (पूर्व)
  • पी उत्तर विभाग – रिद्धी गार्डन मनपा दवाखाना
  • आर मध्य विभाग – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मनपा सर्वसाधारण रूग्णालय, बोरीवली
  • आर मध्य विभाग – चारकोप विभाग 3 प्रसूतिगृह
  • आर दक्षिण विभाग – आकुर्ली प्रसूतिगृह, कांदिवली
  • आर दक्षिण विभाग – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रूग्णालय, कांदिवली (पश्चिम)
  • आर दक्षिण विभाग – इ. एस. आय. एस. रूग्णालय, कांदिवली
  • एस विभाग – एल. बी. एस. प्रसूतिगृह
  • टी विभाग – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मनपा रूग्णालय, मुलुंड (पूर्व)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.