राज्यात गुरुवारपासून पूर्वमोसमी पावसाने जोर धरलेला असताना मुंबईतही आता पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. मुंबईत पुढील आठवड्यात बुधवार-गुरूवारी मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाचे आगमन होईल. असा अंदाज भारतीय वेधशाळेने जाहीर केला.
भारतीय वेधशाळेने पुढील सात दिवसांसाठी जाहीर केलेल्या अंदाजात 20 मे रोजी दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवली. शुक्रवारी सकाळी किमान तापमान २९ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. एका दिवसांत किमान तापमान २ अंशाने वाढ होत शुक्रवारच्या किमान तापमानाने दोन वर्षांतील मे महिन्यातील सर्वात जास्त किमान तापमानाचा रेकॉर्ड मोडला. याआधी ३१ मे रोजी २०२० साली २९.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. गुरुवारच्या कमाल तापमानाच्या ३३.६ अंश सेल्सिअस नोंदीमुळे दोन वर्षांच्या मे महिन्यातील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सकाळच्या उकाड्याला हलकासा ब्रेक लागल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. वीकेण्डला दोन्ही दिवस दुपारी आणि सायंकाळी ढगाळ वातावरण राहील, परिणामी किमान तापमान दोन अंशाने खाली सरकेल. सोमवारी दिवसभर आकाश निरभ्र राहील, त्यानंतर पावसासाठी मुंबईत अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती वेधशाळा अधिका-यांनी दिली.
पुढील सात दिवसांचा मुंबईसाठीचा अंदाज –
तारीख – कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) – किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) – हवामानाचा अंदाज
- २० मे – ३४- २८- आकाश ढगाळ राहील
- २१ मे – ३४-२७- आकाश अंशतः दुपारी आणि सायंकाळी ढगाळ राहील
- २२ मे- ३४-२७- आकाश अंशतः दुपारी आणि सायंकाळी ढगाळ राहील
- २३ मे- ३४-२८- आकाश निरभ्र राहील
- २४मे- ३४-२७- आकाश ढगाळ राहील
- २५मे- ३५-२८- आकाश अंशतः ढगाळ राहील, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
- २६मे- ३५-२८- आकाश अंशतः ढगाळ राहील, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता