धावत्या गाडीत किंवा प्लॅटफार्मवर प्रवाशांची तब्येत खराब झाल्यास वेळीच उपचार न मिळाल्याने यापूर्वी अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सुसज्ज आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता एमबीबीएस, एमडी डॉक्टरांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
( हेही वाचा : पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस व्हिस्टाडोम कोचसह धावणार! )
प्रवाशांची गर्दी आणि मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्यांची आवक-जावक असलेल्या रेल्वे स्थानकावर आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवा हा उपक्रम राबविला जाणार आहे. रेल्वे स्थानकावर प्रवाशांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना यात प्राधान्य दिले जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने विभाग आणि रेल्वे स्थानकांची नावे जाहीर केली आहे. येथे आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवा देण्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव डॉक्टरांकडून मागविले जात आहे. त्यामुळे येत्या काळात धावत्या गाडीत वा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रकृती बिघडल्यास रुग्णांना त्वरीत खासगी वैद्यकीय उपचार घेता येईल, अशी नवी संकल्पना आहे. विशेषत: जंक्शन रेल्वे स्थानकांवर आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवा मिळणार आहे.
या रेल्वे स्थानकावर मिळेल वैद्यकीय सेवा
मध्य रेल्वे भुसावळ विभागातंर्गत नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, अकोला आणि बडनेरा रेल्वे स्थानकावर दवाखाना साकारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी सुसज्ज आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक डॉक्टरांना आयआरईपीएस या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. लवकरच नागपूर रेल्वे विभागातील महत्वाच्या रेल्वे स्थानकावर आकस्मिक खासगी वैद्यकीय सेवेला प्रारंभ होणार आहे.
दवाखाना, फार्मसीसाठी जागा मिळेल
रेल्वे स्थानकावर दवाखाना, फार्मसीसाठी प्रशासन जागा उपलब्ध करून देणार आहे. त्याकरिता जागेचे शुल्क आकारले जातील, अशी निविदेत अट आहे. हा सुसज्ज दवाखाना किंवा फार्मसी रेल्वे स्थानक परिसरातच असेल, अशी जागेची व्यवस्था रेल्वे प्रशासन करून देईल.
Join Our WhatsApp Community