सलग दोन दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे चिपळूण आणि महाडमध्ये हे दोन तालुके अक्षरशः पाण्याखाली गेले आहेत. गुरुवारी रात्रभर पाणी १० ते १५ फूट भरले होते म्हणून मदत कार्य करणे अशक्य होते, परंतु शुक्रवारी, २३ जुलै रोजी पहाटेपासूनच पाण्याची पातळी कमी होताच मदत आणि बचाव कार्याला वेग आला आहे. मात्र तरीही हवामान खात्याने कोकण भागाला आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने चिंता कायम आहे.
स्थानिक मच्छिमारांच्या बोटीही बचाव कार्यात सहभागी!
कालपासून एनडीआरएफची पथके चिपळूण आणि महाडच्या वेशीवर येऊन रखडली होती. कारण दोन्ही तालुक्यांना पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. त्यामुळे आतमध्ये कुठून प्रवेश करायचा असा प्रश्न बचाव पथकाला पडला होता. त्याच बरोबर वीज गेल्याने गावांचा संपर्कही तुटला होता. त्यामुळे अखेर पुराचे पाणी ओसरण्याचाही प्रतीक्षा करावी लागली. पुराचे पाणी चिपळूणमध्ये ओसरल्यावर बचाव पथकांनी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु केले. एनडीआरएफच्या मदतीला स्थानिक मच्छिमारांच्या बोटी आल्या आहेत. त्यामुळे पुरात अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करणे सुरु झाले आहे.
(हेही वाचा : पश्चिम महाराष्ट्रात २०१९च्या आठवणी झाल्या ताज्या! पुणे-बंगळूर महामार्ग बंद!)
नौदलाचे हेलिकॉप्टर मदतीला फिरतेय!
चिपळूणमध्ये एनडीआरएफची २ पथके दाखल झाली आहेत, प्रत्येक पथकात २५ जण असतात, तसेच नौदलाचे हॅलिकॉप्टरही मदतीला आले आहे. विषेशतः महाडमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या गावांमध्ये पोहचणे आजही शक्य होत नाही, त्यामुळे नौदलाचे हेलिकॉप्टर फिरत असून जेथे जेथे मदतीची हाक दिली जात आहे, तेथील नागरिकांना तेथून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. चिपळूण आणि महाड येथे काही ठिकाणी १५-२० फुटापर्यंत पाणी साचले होते. जर चिपळूणमधील पाणी ओसरत चालले असताना महाडमध्ये मात्र पाणी अजूनही कायम आहे.
Join Our WhatsApp Communityमहाडला जायचा आमचा प्रयत्न सुरू आहे. पण टोळ फाट्याला प्रचंड पाणी असल्याकारणाने आम्ही थांबलेलो आहोत. एनडीआरएफच्या मदतीने बोटीने पुढे जायचा आमचा प्रयत्न सुरू आहे. महाड शहर पूर्णपणे पाण्याखाली आहे. लोक आपल्या स्वरक्षणाकरिता गच्चीवर आणि एसटीच्या टपावर बसले आहेत. महाडमध्ये सर्व गावे पुराने वेढलेली आहेत. महाडवासियांच्या रक्षणाकरीता हेलिकॉप्टर येत असल्याने त्यांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्याकरिता मदत होईल. आम्ही मुंबईला संपर्क करून जीवनावश्यक वस्तू प्रयत्न करू पण अडचण अशी आहे की त्यांच्यापर्यंत त्या वस्तू कशा पोहोचतील, कारण पुरामुळे समन्वयाच्या अडचणी आहेत. आम्ही महाडवासियांच्या मदतीकरिता पुढे कसे जाता येईल, अशी धडपड करत आहोत. पुरामुळे यंत्रणा आणि मदत कशी करता येईल हा चिंतेचा विषय आहे.
– प्रवीण दरेकर. विरोधी पक्षनेते, विधान परिषद