आता म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा काळाबाजार! ५ जणांना अटक! 

ममता जळीत नामक महिला आरोपी कोविड सेंटरमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहे. म्युकरमायकोसिसच्या गरजू रुग्णांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन ही महिला महागड्या दरात साथीदारांसह मिळून इंजेक्शन विकत होती. 

कोरोनावरील रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार होत होता. आता काळ्या बुरशी (ब्लॅक फंगस) अर्थात म्युकरमायकोसिस या आजारावरील अँम्फोटेरीन – बी या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला आहे. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे. 1 लाख 69 हजार 442 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गौरव जयवंत जगताप (वय ३१, रा. काळाखडक रोड, वाकड), अमोल अशोक मांजरेकर (वय ३९, रा. सूसरोड, पाषाण, पुणे), गणेश काका कोतमे (वय ३२, रा. जनता वसाहत, पुणे) आणि एक महिला आरोपी ममता देवरावजी जळीत (वय २४, रा. ज्ञानदीप शाळेजवळ, पालांडे यांच्या घरी, रुपीनगर, निगडी) आणि मेडिकल स्टोअरचे प्रदीप लोंढे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

२१ ते ५४ हजार रुपयांपर्यंत विकले जात होते इंजेक्शन!

पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांना खबऱ्यांकडून वाकड येथे काही जण म्युकरमायकोसिस आजारावर वापरण्यात येणारे अँम्फोटेरीन – बी या इंजेक्शनची विक्री करण्याल येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुंड विरोधी पथकाचे हरीश माने आणि त्यांच्या टीमने सापळा लावून नकली ग्राहक बनून चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून अँम्फोटेरीन – बी इंजेक्‍शनचे तीन नग हस्तगत करण्यात आले. त्यांनी हे औषध काळ्या बाजारात विक्रीसाठी आणले होते. या इंजेक्शनची मूळ किंमत 7 हजार 814 रुपये असून हे इंजेक्शन 21 हजार ते 54 हजारपर्यंत विकले जात होते. त्याच बरोबर bevacizumab इंजेक्शन देखील 10 नग महाग विकले जात होते.

(हेही वाचा : महात्मा गांधींच्या पणतीने लुबाडले ३ कोटी! ७ वर्षांचा कारावास!)

गरजू रुग्णांना शोधून लुबाडायचे!

ममता जळीत नामक महिला आरोपी कोविड सेंटरमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहे. गरजू रुग्णांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन ही महिला महागड्या दरात साथीदारांसह मिळून इंजेक्शन विकत होती. ही कारवाई गुंड विरोधी पथकातील सहायक निरीक्षक हरीश माने, हजरत पठाण, गणेश मेदगे, शुभम कदम, राम मोहिते, विनोद तापकीर यांच्या पथकाने केली आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना आजारानंतर म्युकरमायकोसिस आजारांमुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here