आता म्युकरमायकोसिसच्या औषधाचा काळाबाजार?

म्युकरमायकोसिस या संसर्गजन्य आजारासाठी उपयुक्त असलेल्या अँफोटेरीन बी या इंजेक्शनचे वितरणही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तेव्हापासून बाजारात या औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

98

सध्या केंद्र सरकार असो कि राज्य सरकार, कोणत्याही साथीचा रोग आला कि, ताबडतोब त्याच्या औषधाचे वितरण स्वतःकडे घेत आहेत, ज्यांचा औषधे विकण्याचा धंदा आहे, त्यांच्याकडूनच औषधाचा साठा ताब्यात घेऊन ती औषधे या क्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्या जिल्ह्याधिकाऱ्यांना मार्फत वितरित करतात. अशा प्रकारे सरकारने कोरोनासंबंधी रेमडेसिवीर, टोसिलीझुम्याब या औषधांचे वितरण स्वतःकडे घेतल्यानंतर आता म्युकरमायकोसिस या संसर्गजन्य आजारासाठी उपयुक्त असलेल्या अँफोटेरीन बी या इंजेक्शनचे वितरणही स्वतःकडे घेतले आहे. परिणामी कालपर्यंत सहज उपलब्ध होणारे  रेमडेसिवीर इंजेक्शन जसे त्यानंतर तुटवडा जाणवू लागल्याने काळ्याबाजारात मिळू लागले, तसे अँफोटेरीन बी या इंजेक्शनचाही आता तुटवडा निर्माण झाला असून त्याचाही काळाबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हळूहळू बहुतेक सगळीच औषधे अशी मिळायला लागली, तर ती वेळेवर आणि योग्य किमतीत कशी भेटणार? काळाबाजार थांबवा म्हणून हे असे चुकीचे निर्णय का घेतले जात आहेत? कोरोनच्या पहिल्या लाटेत मेडिकलमधून रेमडेसिवीर रुग्णांना सहज मिळत होते, मात्र आता कंट्रोल आणि निर्णय अशा यंत्रणेने घेतला आहे, ज्यांना यातील काहीही माहित नाही, त्यामुळे या औषधांचा काळाबाजार होतो,  यात तीळमात्र शंका नाही. आता म्युकरमायकोसिसरुग्णांचे नातेवाईक हताशपणे प्रिस्क्रिप्शन घेऊन भटकत असतात. रुग्णांची ससेहोलपट करणे हे चूकच आहे. हे असे करून यंत्रणा नकळत काळ्या बाजाराला प्रोत्साहन देते आहे का?
– कैलास तांदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशन.

New Project 8 7

औषध विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर!

दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा औषध विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. आधीच जिल्ह्याधिकाऱ्यांकडे कामाचा व्याप अधिक असतो, त्यात अपुरे मनुष्यबळ, अशा स्थितीत तातडीने रुग्णांना लागणारी ही औषधे सरकार औषध विक्रेत्यांसारखी साखळी आधीच असताना आणि रुग्णांना त्यामुळे ती लगेच उपलब्ध होऊ शकतील, अशी परिस्थितीत असताना सरकार मात्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या औषधांचे वितरण करत आहे. त्यामुळे रुग्णांना ती लवकर मिळत नाहीत. थेट रुग्णालयांना औषधे पुरवण्याची कार्यपद्धत लावल्याने ती औषधे रुग्णालयांनाच दिली जातात का? पुढे रुग्णालयात ती औषधे रुग्णांना दिली जातात का? हे देखील प्रश्न आहेत. म्हणूनच मागील दोन महिन्यांपासून राजकारणी परस्पर ६-७ हजार रेमडेसिवीर वितरित करतात, रुग्णालयातील कर्मचारी परस्पर काळ्याबाजारात विकतात, रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्याबाजाराने विकणाऱ्या टोळी हे इंजेक्शन विकतात, असे प्रकार उघडकीस आले आहेत. जर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे, तर मग रेमडेसिवीरचा काळाबाजार का सुरु आहे, असा प्रश्न आहे औषध विक्रेते विचारत आहेत.

(हेही वाचा : झायडस कॅडीलाच्या औषधाचा संभाव्य ‘काळाबाजार’ कसा रोखणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत)

आता म्युकरमायकोसिस रुग्णांची हेळसांड!  

आता सरकारने शुक्रवार, १४ मे पासून म्युकरमायकोसिस या संसर्गजन्य आजारासाठी उपयुक्त असलेल्या अँफोटेरीन बी या इंजेक्शनचे वितरणही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हापासून बाजारात या औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी प्रचंड वाढली असून पुरवठा थांबलेला आहे. या एका इंजेक्शनची किंमत ४ हजार रुपये आहे, एका रुग्णाला १६-१७ इंजेक्शन द्यावी लागतात, त्यामुळे साहजिकच या इंजेक्शनची प्रचंड मागणी वाढलेली आहे. विशेष म्हणजे हा आजार झपाट्याने शरीरात पसरतो आणि मृत्यू ओढवतो. म्हणून या औषधाचा पुरवठा शीघ्रतेने व्हावा, अशी अपेक्षा असते, मात्र आता हे औषधही मिळणे कठीण होणार असल्याने साहजिक या औषधाचाही काळा बाजार होणार आहे, असे महाराष्ट्र रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे म्हणाले.  हा आजार या आधीही होताच, पण आता कोरोनाग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात स्टेरॉईड आणि अँटिबायोटिक द्यावे लागत आहे. अशावेळी मधुमेह असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना हा आजार लगेच जडत आहे. त्यामुळे या आजाराचे रुग्ण वाढण्यामागे कोरोना हे कारण आहे, असेही तांदळे म्हणाले.

म्युकरमायकोसिसच्या (ब्लॅक फंगस) म्हणजे काय?

  • म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य रोग आहे. हा रोग ‘म्युकोरेल्स’ या फंगसमुळे होतो.
  • कोविडच्या उपचारानंतर काही रुग्णांमध्ये याचा संसर्ग दिसून येत आहे.
  • कोविडमुळे व मधुमेह किंवा इतर सहव्याधींमुळे, तसेच उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉइडमुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते या संधीचा फायदा बुरशी [फंगस] घेते व या रोगाला सुरुवात हाेते.
  • नाकाच्या मार्गे ही बुरशी नाकामागच्या सायनसमध्ये, तोंडामध्ये विशेषत: वरच्या जबड्यात व दातात, डोळ्यापासून ते मेंदूपर्यंत पोहचते.
  •  या बुरशीचा पसराव अति वेगाने असून उपचारासाठी खुपच कमी वेळ मिळतो.
  • लवकर निदान झाले तर औषोधोपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो, पण उशीर झाला, तर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते.
  • कोरोनासोबत ‘हे’ रोग असल्यास म्युकरमायकोसिसची लागण लवकर होतेमधुमेह/डायबिटीज, HIV / AIDS, जास्त वेळ व मात्रामध्ये स्टिरॉइडचा वापर, ब्लड प्रेशर, विविध कँसर, लिव्हर सिरोसिस, अति लठ्ठपणा

निदान करण्यासाठी लक्षणे

  • तोंड व दांत चेहर्‍यावर सूज येणे, तोंडातून दुर्गंधी येणे, तोंडातून पू येणे, हिरड्यांवर फोड़ किवा सूज येणे, अचानक दात हालणे व पडणे, दातांची जखम न भरणे.
  • नाक – सर्दी असणे, नाक बंद असणे, साइनसच्या जागेत दुखणे, नाकातून रक्त येणे, नाक दुखणे
  • डोळे – डोळे दुखणे व सुजणे, डोळ्यांनी कमी दिसणे/ न दिसणे
  • मेंदू – डोके दुखणे, मेंदूच्या नसांचा त्रास होणे

निदान कसे करणार?

  • बायोप्सी (Biopsy), बुरशीच्या जागेतून तुकड़ा काढून टेस्टिंग करणे, नाकातून स्वॅब घेऊन तपासणी, रेडियोलॉजिकल सिटी स्कॅन, एमआरआय.
  • वरील लक्षणे आढळ्यास खालील डॉक्टरांचा सल्ला घेणे व वेळेवर ताबड़तोब उपचार करून घेणे.
  • दंतरोग तज्ञ, नाक, कान, घसा तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, मेंदु रोग तज्ञ, फिजिशियन

उपचार कसा करावा?

  • मधुमेह व इतर रोगांचा उपचार करून नियंत्रण करावे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताबड़तोब आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करून खराब झालेले हाड़ व शरीराचा इतर भाग काढून घेणे.
  • औषधोपचार – इंजेक्शन – अँफोटेरीसिन बी, गोळ्या – इसावुकोनाझोल (Isavuconazole) किंवा पोसैकोनझोल (Posaconazole)

कोरोनानंतर म्युकरमायकोसिस न हाेवो यासाठी घ्यावयाची काळजी

  • शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवा.
  • स्टेरॉइडचा गरजेपेक्षा जास्त वापर नको.
  • अॅक्सिजन थेरपीसाठी स्वच्छ निर्जंतुक पाण्याचा वापर ह्युमिडीफायरसाठी करा.
  • रुग्णांनी नाक, डोळे, तोंडाची व शरीराची योग्य ती स्वच्छता ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
  • कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.

राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. त्याचबरोबर महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गतच्या रूग्णालयातही हे उपचार मोफत होतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.