मुंबईत लोकल प्रमाणे बेस्ट बसची प्रवासी संख्याही मोठी आहे. बेस्टने कोरोना लॉकडाउनच्या काळात जनतेला अविरत सेवा प्रदान केली. आता बेस्टने नवा व जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे. याआधी बेस्टचा पास काढताना प्रवाशांना बेस्ट डेपोपर्यंत पायपीट करावी लागत असे, पण आता हा त्रास कमी होऊन बेस्टचा पास प्रवासादरम्यान कंडक्टरकडेच उपलब्ध होणार आहे.
कंडक्टर देणार पास
बेस्टमध्ये कंडक्टर प्रवासादरम्यान तिकीट काढून देतात. अगदी त्याचप्रमाणे नव्या कंत्राटानुसार प्रवाशांना बसचा पाससुद्धा कंडक्टरकडे काढता येणार आहे. अशी माहिती धारावी डेपोमधील बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिली आहे. कंडक्टरजवळ असलेल्या तिकीट मशिन आता अद्ययावत करण्यात आल्या आहेत, त्यामुळे आता पास काढणे सोपे होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा : बापरे! रुग्णालयांत इंजेक्शन देण्यासाठी सुईच मिळणार नाही )
वेळेची बचत होणार
बेस्ट बसच्या नव्या उपक्रमामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असून, आता पाससाठी डेपोपर्यंत जाऊन रांगेत उभे राहावे लागणार नाही. जवळपास २० डिसेंबरपर्यंत बसमध्ये पासची सुविधा उपलब्ध होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिकीट मशिनचे रूप पूर्णपणे पालटून आता कंडक्टरकडे टच स्क्रिन मशिन पाहावयास मिळत आहेत.