आता नागपूरच्या कोविड रुग्णालयाला आग; ४ जणांचा मृत्यू 

नागपुरातील कोविड रुग्णालयाला आग लागल्यावर रुग्णांना सुरक्षितपणे अन्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

सध्या राज्यात कोविड सेंटर आणि कोविड रुग्णालयांना आगी लागण्याचे प्रकार वाढले असून या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. शुक्रवारी, 9 एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास नागपूर-अमरावती मार्गावरील वेल ट्रीट रुग्णालयाला आग लागली. ज्यामध्ये ४ जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

२७ रुग्णांना केले स्थलांतरित!

या रुग्णालयाची ३० खाटांची क्षमता आहे. यातील सर्व खाटा भरल्या होत्या. त्यातील ३ रुग्णांना शुक्रवारी घरी पाठवण्यात आले,  त्यामुळे रुग्णालयात २७ रुग्ण होते. जेव्हा रात्री अचानक रुग्णालयाला आग लागली, तेव्हा धूर निघू लागला. त्यानंतर धावपळ  झाली, रुग्णालयातील रुग्णांना सुरक्षितपणे दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यातील काही रुग्ण आणि कर्मचारी बरेच घायाळ झाले. त्यातील ४ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. दुर्घटनेनंतर रुग्णालयातील रुग्णांना मेयो,  लता मंगेशकर आणि जीएमसी रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले. यामध्ये एक डॉक्टरही घायाळ झाल्याची माहिती आहे. हे रुग्णालय डॉ. राहुल ठवरे यांच्या मालकीचे आहे.

अशी लागली आग!

रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डला आग लागल्यावर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. जेव्हा आग लागली तेव्हा या वॉर्डात १० रुग्ण होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले.

(हेही वाचा : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत रुग्णालयात दाखल)

चांदवड कोविड सेंटर जाळून खाक 

मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे नेमिनाथ जैन महाविद्यालयासमोर एका इमारतीत तालुक्यातील काही खाजगी डॉक्टरांच्या सहभागाने कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. इमारतीच्या तिसरया मजल्यावर सुरू करण्यात येणार्‍या या कोविड सेंटरचे उदघाटन मंगळवारी, ६ एप्रिल रोजी होणार होते, मात्र त्याआधीच त्याला आग लागून हे सेंटर जळून खाक झाले. सुदैवाने हे सेंटर सुरु होण्याआधीच आग लागली, अन्यथा जर रुग्ण भरती केल्यावर आग लागली असती तर मोठा अनर्थ झाला असता.

भांडुपच्या सनराईज रुग्णालयालाही लागलेली आग 

२५ मार्च रोजी रात्री ११.५९ वाजता अचानक भांडुप येथील ड्रीम्स मॉलला आग लागली. त्यानंतर तेथील धुराचे लोट तिसऱ्या मजल्यावरील सनराईज कोविड रुग्णालयात पसरले. ज्यामध्ये १० रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला.

भंडाऱ्यातही झालेले अग्नितांडव 

९ जानेवारी २०२१ रोजी भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागालाच आग लागली होती. ज्यामध्ये १९ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला, त्यातील ७ बालकांना वाचवण्यात यश आले. या प्रकरणी विशेष चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार दोन कर्मचारी दोषी आढळून आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here