आता भटक्या कुत्र्यांच्या मागे धावणार महापालिका

मुंबईतील भटक्या श्वानांची पुन्हा गणना केली जाणार असून त्यादृष्टीकोनातून लवकरच याच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे. यापूर्वी सन २०१४मध्ये भटक्या श्वानांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे ९ वर्षांनी पुन्हा एकदा श्वानांच्या गणनेचे काम हाती घेतल्याने या भटक्या श्वानांच्या पाठिमागे आता कर्मचारी धावताना दिसणार आहेत.

मुंबईत यापूर्वी केलेल्या २०१४ च्या सर्वेक्षणात भटक्या कुत्र्यांची संख्या ९५ हजार १९५ एवढी होती. परंतु प्रत्यक्षात या भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात राखण्यासाठी नसबंदीची योजना राबवली जात असली तरी प्रत्यक्षात या श्वानांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे ही संख्या एक लाखाच्या वर पोहोचली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भटक्या श्वानांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पशु वैद्यकीय आरोग्य खाते व देवनार पशुवधगृहाच्यावतीने मेसर्स एचएस आय या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. भटक्या श्वानांचे सर्वेक्षण करणारी ही जागतिक संस्था असून याच संस्थेच्या वतीने सन २०१४मध्ये सर्व भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. भटक्या श्वानांचे सर्वेक्षण करण्यासाठी अशासकीय/शासकीय प्राणी कल्याण संस्था उपलब्ध नसल्याने महापालिकेने पुन्हा या संस्थेवर श्वानांची गणना करण्याची जबाबदारी सोपवली आहे. अतिरिक्त आयुक्त यांच्या मंजुरीनंतर हे काम या संस्थेला देण्यात आले असून या संस्थेच्या वतीने भटक्या श्वानांचे सर्वेक्षण करून त्यांची एकूण संख्या, विभागनिहाय संख्या व इतर बाबींचे मुल्यमापन करून त्यानुसार प्रभावीपणे प्राणी जनन नियंत्रण कार्यक्रम राबवण्याचे धोरण ठरवले जाईल, असे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या सर्वेक्षणासाठी १२ लाख ६७ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.

(हेही वाचा नवीन पेन्शन योजनेत भाजपा-शिवसेना सरकार करणार सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here