आता कोविड रुग्णांवर उपचार सेव्हन हिल्ससह महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये, एकमेव शीव कोविड सेंटर ठेवले राखीव

123

कोविड रुग्णांची संख्या घटल्याने आता पहिल्या टप्प्यात ३ जंबो कोविड सेंटर बंद करण्यात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी ५ सेंटर बंद करण्यात येत आहे. परंतु याठिकाणी असलेली लसीकरण केंद्र मात्र सुरु ठेवली जाणार आहे. नव्याने आढळून येणा-या ‘कोविड’ बाधित रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने सेव्हन हिल्स रुग्णालयासह महानगरपालिकेची ४ प्रमुख रुग्णालये, १६ उपनगरीय रुग्णालये आणि कस्तुरबा रुग्णालय या ठिकाणी कोविड बाधित रुग्णांवर योग्य ते औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त शासनाच्या अखत्यारितील रुग्णालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी देखील उपचार सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय सोमय्या जम्बो सेंटर, शीव (सायन) येथे एक जम्बो कोविड केंद्र सुसज्ज ठेवण्यात आले आहे.

( हेही वाचा : भूमीहीनांना जागा खरेदी करताना मिळणार विशेष सवलत )

एकमेव शीव कोविड सेंटर ठेवले राखीव

‘कोविड’ बाधित रुग्णांवर प्रभावी उपचार करता यावेत, यासाठी मुंबई महानगरपालिकेने विविध ८ ठिकाणी ‘कोविड जंबो केंद्रे’ सुरु होती. या ८ ‘ जंबो कोविड सेंटर’मध्ये १२ हजार ३७५ रुग्‍णशय्या व ९०७ अतिदक्षता रुग्‍णखाटा होत्या. या उपचार केंद्रांच्या माध्यमातून लाखो रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले. यामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचविणे शक्य झाले. त्यानंतर मुंबई नागरिकांचे प्रभावीपणे लसीकरण करण्यात आले. परिणामी, गेल्या काही महिन्यांमध्ये ‘कोविड’ बाधित रुग्णांसह लक्षणे असणा-या रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तसेच रुग्णालयांमध्ये कोविड रुग्ण भरती होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘कोविड जंबो केअर सेंटर’ टप्पेनिहाय बंद करण्याचे निश्चित केले. यानुसार पहिल्या टप्प्यात दहिसर, नेस्को – गोरेगांव आणि कांजूरमार्ग येथील ‘जम्बो कोविड केअर सेंटर’ ही तीन केंद्र यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत. तर आता दुस-या टप्प्यात वांद्रे – कुर्ला संकुल, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास भायखळा, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास मुलुंड, एन. एस. सी. आय. वरळी आणि मालाड आदी ५ ‘जंबो कोविड केअर केंद्रे’ बंद करण्याचे ठरविण्यात आले आहे. तथापि, या ठिकाणी कार्यरत असणारी लसीकरण केंद्रे सुरु राहणार आहेत. ज्यामुळे, लसीकरणाबाबत नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. ‘कोविड’ बाधा झाल्यास संबंधित रुग्णांना वेळच्यावेळी योग्य उपचार मिळावेत, या हेतूने सेव्हन हिल्स रुग्णालयासह महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ‘कोविड’ उपचार सुविधा कार्यरत असणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे.

‘कोविड’ बाधित रुग्णांची संख्या घटल्यामुळे ८ ‘जम्बो कोविड केअर केंद्रे’ बंद करण्यात येत आहेत. नव्याने आढळून येणा-या ‘कोविड’ बाधित रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने सेव्हन हिल्स रुग्णालयासह महानगरपालिकेची ४ प्रमुख रुग्णालये, १६ उपनगरीय रुग्णालये आणि कस्तुरबा रुग्णालय या ठिकाणी कोविड बाधित रुग्णांवर योग्य ते औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त शासनाच्या अखत्यारितील रुग्णालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी देखील उपचार सुविधा उपलब्ध आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सदर तिनही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये एकूण ११ हजार १६५ रुग्णशय्यांची उपलब्धता असून आवश्यकतेनुसार ही संख्या वाढविता येऊ शकेल. तसेच सोमय्या जम्बो सेंटर, शीव (सायन) येथे एक जम्बो कोविड केंद्र सुसज्ज ठेवण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा : खुशखबर, राज्यभरात कोरोना रुग्णसंख्या खालावली )

शीव येथील जंबो कोविड सेंटरचे बांधकाम म्हाडाच्या माध्यमातून बांधण्यात आले असून याठिकाणी २०० आयसीयू खाटांसह एकूण १२०० खाटांची क्षमता आहे. म्हाडाच्या माध्यमातून या कोविड सेंटरचा ताबा घेण्याची प्रक्रीया सुरु आहे. सध्या याठिकाणी लसीकरण केंद्र सुरु असून महापालिकेने हे केंद्र सुसज्ज ठेवण्यात आल्याचा दावा केला असला तरी अद्यापही या केंद्राचा ताबा महापालिकेकडे आला नसून हे केंद्र ही सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे हे केंद्र अद्यापही बंदच स्थितीत असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.