न्यूमोनियामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण मुंबईत २०२५ पर्यंत होणार कमी

देशात ५ वर्षाखालील बालमृत्यू दर हा दर हजारी जिवंत बालकांच्या पाठीमागे ७४ वरुन ३७ वर आलेला आहे, असे असले तरीही परिणामकारक उपचार व लस उपलब्ध असूनही बालकांमध्ये होणा-या न्युमोनिया ह्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या गंभीर आजाराची व्याप्ती लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने SAANS Initiative अंतर्गत न्युमोनिया पासून बचाव, प्रतिबंध व उपचार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना विकसित केल्या आहेत. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या निर्देशांन्वये मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने १२ नोव्हेंबर २०२२ ते दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत SAANS उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाचे प्रमुख ध्येय सन २०२५ पर्यंत भारतात बालकांमधील न्युमोनियामुळे होणा-या बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी जिवंत बालकांमध्ये ३ पेक्षा कमी करणे हे आहे.

वस्ती पातळीवरुन संदर्भित करण्यात येणा-या गंभीर आजारी बालकांस, न्युमोनियाची लक्षणे आढळून आल्यास सदर बालकांना उपचार व मार्गदर्शन करण्यात येईल व तसेच आवश्यकता असल्यास रुग्णालयात दाखल करण्यात येईल. सदर उपक्रमात महानगरपालिकेचे दवाखाने, प्रसुतिगृह, उपनगरीय रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालये येथे येणा-या बाह्यरुग्ण विभागातील बालकांना तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात येईल.

खोकला आणि सर्दी वाढणे, श्वासोच्छवास वेगाने होणे, श्वास घेताना छाती आत ओढली जाणे, ताप येणे इत्यादी लक्षणे लहान बालकांत आढळून आल्यास पालकांनी अधिक उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्र, दवाखाना, प्रसुतिगृह व रुग्णालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांद्वारे गृहभेटी देऊन आजारी बालकांचा शोध घेऊन, बालकांमध्ये न्युमोनियाची लक्षणे आढळून आल्यास त्यांना उपचाराकरीता नजीकच्या दवाखाने / रुग्णालये येथे संदर्भित करुन उपचार करण्यात येईल. तसेच जास्तीत-जास्त बालकांना PCV (न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन) देण्यास प्रवृत्त करुन बालकामध्ये न्युमोनियाचा आजार होण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल.

न्युमोनियाची प्रमुख लक्षणेः-

  • खोकला आणि सर्दी वाढणे, श्वासोच्छवास वेगाने होणे, श्वास घेताना छाती आत ओढली जाणे, ताप येणे इत्यादी.
  • SAANS Campaign उपक्रमांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वस्ती पातळीवर व आरोग्य संस्था स्तरावर खालील गोष्टी राबविण्यात येणार आहेत. SAANS Campaign चा उपयोग गोवर प्रार्दुभाव टाळण्यासाठीही प्रभावीपणे राबविता येऊ शकतो, असे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी कळविले आहे.

SAANS Campaign चे उद्दिष्टः-

  • बालकांमधील न्युमोनियापासून प्रतिबंध व बचाव करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सामाजिक स्तरावर जनजागृती करणे.
  • न्युमोनिया आजार ओळखण्याबाबत पालकांना / काळजी वाहकांना (Care Taker) सक्षम बनविणे.
  • न्युमोनिया आजारास गंभीरपणे घेण्यासाठी तसेच वेळेत उपचार / काळजी घेण्यासाठी न्युमोनिया आजाराविषयी असलेले गैरसमज व चुकीच्या कल्पना दूर करुन पालकांच्या / काळजी वाहकांच्या वर्तणुकीत बदल करणे.
  • Pneumococcal Conjugate Vaccine (PCV) या लसीबाबत जनजागृती करणे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here